Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Updates : कोविड रुग्णांसाठी चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रात एक महिन्यात कोविड रूग्णालय – पालकमंत्री सुभाष देसाई

Spread the love

औरंगाबाद  जिल्ह्यातील कोरोना बांधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील मेल्ट्रॉनच्या इमारतीत एक महिन्यात कोविड रुग्णालयाची उभारणी करावी, असे निर्देश उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. या रुग्णालयासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत कोविड -19 रुग्णालय उभारणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, जिल्हाधिकारी उदय  चौधरी, पोलीस आयुक्त  चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपाच्या जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींसह एमआयडीसी व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

कोविड या आजाराने वाढत असलेल्या रुग्णांच्या उपचाराकरिता स्वतंत्र कोविड रुग्णालयासाठी चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील मेल्ट्रॉनची इमारत जी सध्या सिपेट (केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) यांना भाड्याने दिलेली आहे व सद्य स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक विभाग यांच्या ताब्यात आहे, या इमारतीत प्रास्तावित कोव्हीड रुग्णालय उभारणे शक्य असल्याचे दि. 9 मे रोजी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये औदयोगिक महामंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचित केले होते.  त्या अनुषंगाने पालकमंत्री यांनी आजच्या बैठकीत सूचना करताना सांगितले की, मुंबईमध्ये एमएमआरडीएने बीकेसीच्या जागेवर ज्या प्रकारे कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे, त्याच धर्तीवर मेल्ट्रॉनच्या इमारतीत कोव्हीड रुग्णालयाची एमआयडीसीने एक महिन्यात उभारणी करावी. तत्पुर्वी  मेल्ट्रॉनची जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने जिल्हा प्रशासनाने करावी.

रुग्णालय उभारणीचा खर्च महाराष्ट्र औदयोगिक महामंडळाच्या निधीतून केला जाईल. एक महिन्यात इमारतीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासोबतच स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे काम केले जावे. तसेच कमीत कमी वेळेत साहित्य उपलब्ध करुन घ्यावे, त्याकरीता शॉर्ट टेंडरची प्रक्रीया अवलंबण्यात यावी.  रुग्णालय उभारणी, खरेदी प्रक्रीया व कार्यान्वयन यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करुन जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाव्यात. सदरील भूखंडावरील 250 खाटांच्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी. रुग्णालयासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू देऊ नये. सर्व नियमांचे पालन करुनच रुग्णालयाची निर्मिती करण्याची सूचना करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, रुग्णालयाची जलदगतीने उभारणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने लक्ष घालावे. या कामासाठी शासनकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. मेल्ट्रॉनचा भूखंड साधारण 10 हजार चौ. फूटाचा आहे. 5 हजार 702 चौ.फूट बांधकाम क्षेत्र आहे. या ठिकाणी एकूण आठ हॉल आहेत. सुमारे 250 खाटांचे कोविड रुग्णालय येथे उभारण्यात येणार आहे. विदयुत व पाणी पुरवठयाची सुविधाही उपलब्ध आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सिपेटला दिली भेट

उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट (केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) इमारतीस भेट देऊन पाहणी केली. विषाणूच्या अनुषंगाने भविष्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीची संभाव्यता लक्षात घेऊन, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतीची पाहणी आज श्री. देसाई यांनी आज  केली. या इमारतीत असलेल्या सोयी  सुविधांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी श्री.देसाई यांना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, मनपाच्या जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!