Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdates : रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासकीय आरोग्य यंत्रणांच्या सक्षमीकरणाला प्रथम प्राधान्य असून त्यादृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करुन पूरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल. येत्या काळात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन यंत्रणांनी अधिक प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबतची आढावा बैठक पालकमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली,त्यावेळी त्यांनी संबंधितांना विविध निर्देश दिले. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महानगर पालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलिस अधिक्षक (ग्रामिण) मोक्षदा पाटील, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णातील ६० टक्के रुग्णांवर मनपाच्या कोवीड सेंटरमध्ये योग्य ते उपचार केल्या जात असून जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह जे रुग्ण कमी धोक्याच्या स्थितीत आहेत त्यांच्यावर तर अति गंभीर रुग्णांवर घाटीमध्ये उपचार केल्या जात असून या दोन्ही ठिकाणी व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे येथील एमजीएम, तसेच दोन आयुर्वेदिक महाविद्यालयांसोबत देखील विस्तारीत व्यवस्था करण्यासाठी बोलणे सुरु आहे. तसेच घाटीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत परिपूर्णरित्या तयार असून सद्यस्थितीत तिथे तातडीने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी भरती होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.

सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन महिन्यांसाठी  मनुष्यबळ भरती करण्यासाठी जाहिरात दिली असून ती भरती लवकरच सुरु होईल मात्र त्या मनुष्यबळासाठीच्या वेतनाचा खर्च हा अधिक असून तीन महिन्यापेक्षा अधिक काळासाठी पूरेशा मनुष्यबळाची गरज पडणार आहे हे लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने त्यासाठी आर्थिक सहाय्य केले तर मनुष्यबळाचा प्रश्न दिर्घकाळासाठी सुटु शकेल,असे अधिष्ठाता डॉ. कानन  येळीकर यांनी सांगितले.

मनपा आयुक्त  आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सयुंक्त कृतीदल (टास्क फोर्स) द्वारे कॉन्टॅक्ट मॅपिंग करण्यात येत असून यामुळे लवकरात लवकर बाधीताच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण करणे आणि त्यातुन वाढता प्रसार रोखणे शक्य होत आहे. तसेच ‘ माझा वार्ड कोरोनामुक्त ’ या अभियानाद्वारे लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागातुन जनजागृतीद्वारे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत.तातडीने उपचार मार्गदर्शनासाठी २४ X ७ या पद्धतीने दुरध्वनी सेवा ही सुरु आहे. शोधणे, तपासणे, विलगीकरण या त्रिसुत्रीचा वापर करुन सध्या जॉईंट स्ट्रीट(गल्ली) पेट्रोलिंग मोहीम राबवण्यात येत आहे. विलगीकरण कक्षही तयार करण्यात आले असून ट्रिपल सी सुविधेसह चार हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच मनपातर्फे राबवण्यात येत असेलेल्या इतर विविध उपाययोजनाबाबत पांडेय यांनी यावेळी माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी आतापर्यंत ग्रामिण भागात कोरोना संसर्ग झालेला नव्हता, पण सध्या दहा कोरोनाचे रुग्ण ग्रामिण भागात आढळून आले आहेत.मात्र त्या भागातील  पाच प्रतिबंधित क्षेत्रापैकी तीन क्षेत्रे कोरोनामुक्त झाले आहेत.ग्रामिण भागात लोकसहभागातून गावाबाहेरील व्यक्तीस प्रभावीरित्या पोलिस यंत्रणासोबत गावकरी अटकाव करत आहेत.जिल्हा परिषदेमार्फत हा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवल्या जात असून ग्रामस्थांच्या ऑक्सीजन स्तराची तपासणी करण्यासाठी सर्वैक्षण सुरु करण्यात आल्याचे .गोंदवले यांनी सांगितले.

प्रतिबंधित क्षेत्रात पेट्रोलिंग करण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या कडक अमंलबजावणीसाठी कम्युनिटी पोलिसिंग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. ग्रामिण भागात बाहेरील व्यक्तींची ये-जा रोखण्यासाठी सीमाबंदी, शहरसीमा बंदोबस्त तसेच मास्क न वापरणारे, नियमांचे उल्लघंन करणा-यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने ग्रामिण भागात प्रादुर्भाव आटोक्यात असल्याचे पोलिस अधिक्षक श्रीमती पाटील यांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांनी जिल्हा रुग्णालयांतून दहा दिवसानंतर डिस्चार्ज या नियमाने १४९ रुग्णांना बरं करुन घरी सोडण्यात आले असून सध्या मनपा,घाटी आणि जिल्हा रुग्णालय असे एकत्रित १०१ रुग्ण आता दाखल असून याठिकाणी दाखल रुग्णांचा ऑक्सिजनस्तर व्यस्थित असल्याची माहिती दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!