#CoronaLockdownEffect : …..” कोनो चिंता नाही ना करे , कल के रेलसे हम घर पहूंच रहे है ….!!” असे बोलून ” ते ” भोपाळसाठी “असे ” रवाना झाले….

Advertisements
Advertisements
Spread the love

देशात कोरोना एका बाजूला , सरकार एका बाजूला , विविध राज्यांची सरकारे एका बाजूला , विदेशी भारतीय एका बाजूला , आणि दुसऱ्या बाजूला पोटासाठी अनेक राज्यात लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले परप्रांतीय मजूर . आपल्याच देशात राहून कपाळावर “परप्रांतीय ” नावाची भळभळती जखम घेऊन फिरणारे अश्वत्थामाचं जणू …औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडनजीकच्या सटाणा शिवारात तब्ब्ल १६ मजूर मालगाडीखाली चिरडले गेले आणि शुक्रवारची पहाट  मोदी सरकारचे पार वस्त्रहरण करून गेली . पण वस्त्रहरण हा शब्द या सरकारला लागू पडत नाही कारण या सरकारच्या अंगावर वस्त्रच नाही !! लोकभाषेत बोलायचे तर हे भोंगळे सरकार आहे . अर्थात सरकारचा हा भोंगळपणा सर्वसामान्य लोकांसाठी आहे म्हणून लोकार्थाने हे भोंगळे सरकार आहे तर धनाढ्य आणि श्रीमंत लोकांसाठी तर हे कितीतरी कोटी कि लाख रुपयांचा सूट घालणाऱ्यांचे मोदींचे हे सरकार आहे. हे लोक तुच्याच सरकारच्या नीतीचे बळी आहेत. हा अपघात नाही खरे तर तुमच्या धोरणांनी केलेली हत्या आहे . पण मानले तर !! या बद्दल पंतप्रधान , गृहमंत्री , रेल्वेमंत्री यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता असती तर त्यांनी राजीनामे देणे गरजेचे होते पण या देशात असे आता काहीही घडणार नाही . कारण या गोर घरोबा मजुरांचे जीव इतके संवेदनशील नाहीत. शिवाय त्यांनी या कामगारांना आता रेल्वेने शांत आणि निपचितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे.

Advertisements

जालन्याहून जेंव्हा हे कामगार निघाले असतील तेंव्हा त्यांच्या घरच्यांशी ते बोलले असतील कि , ” कोनो चिंता नाही ना करे ,  अभि हम औरंगाबाद जा रहे हैं , वहांसे भुसावल  जायेंगे और कल के रेलसे हम घर पहूंच रहे है ….!!” आणि ते निघालेच होते आपल्या घरी जाण्याच्या निश्चयाने पण काळाने त्यांना मध्येच गाठले. गाठोड्यातील चपात्या घटनास्थळावर विखुरल्या गेल्या , खिशातील बायका -मुलांचे फोटो  रेल्वे रुळावर अस्ताव्यस्त पसरले  त्यांच्या  छिन्न -विच्छिन्न देहा सारखे….त्यांच्यातले वाचलेले तरुण मजूर हि आप बिती  सांगत होते . दुसरीकडेही असे अनेक लोक आपली कहानी सांगत आहेत. माध्यमे ती दाखवतही आहेत पण सरकारच्या ट्विट मध्ये यांच्यासाठी ना काही स्थान आहे न कुठले नियोजन …..

Advertisements
Advertisements

या १६ लोकांच्या मृत्यूने मोदी सरकारवर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पण या प्रश्नांची उत्तरे  देणार कोण ? क्षणार्धात हि बातमी कोरोना व्हायरस पेक्षाही अधिक वेगाने जगभर पसरली. अगदी करमाड वार्ता ते बीबीसी पर्यंत आज या बातमीचा वावर होता. घटनास्थळाचे फोटो , व्हिडीओ सोशल मीडियावर दिवसभर फिरत होते.  लोक याबद्दल नाही नाही ते बोलत होते . यानिमित्ताने अनेक लोकांनी असे कसे काय झाले म्हणून चिंता व्यक्त  केली , काही लोकांनी,  रेल्वे रुळावर कोणी झोपतं का ? एवढही त्यांना कळले नाही का ? असे एक ना अनेक तर्क लावले पण त्यांच्यावर हि वेळा का आली ? आणि त्यांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण ? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यक्तीला मोदी विरोधक म्हणजेच राष्ट्र विरोधक समजले जाईल. झालेही तसेच ….विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली तर सरकारने त्यांना आवाहन केले आहेत तिथेच थांबा.  तोपर्यंत आम्ही जगभरात ५ -५० विमानाच्या फेऱ्या करून विदेशात अडकलेल्या आपल्या अनिवासी भारतीय बंधू भगिनींना हिंदुस्थानात घेऊन येतो . अर्थात १६ मजुरांच्या मृत्यूची हि बातमी येताच  परम आदरणीय १३० कोटी भारतीय जनतेचे  कैवारी  आणि विश्व वंदनीय नेते नरेंद्र मोदी यांचे ट्विट आले.

रेल्वेमंत्र्यांशी ते काय बोलायचं ते बोलले आहेत म्हणे . वास्तविक हे महाशय,  खरं तर मागच्या वेळीच लॉक डाऊनचा तिसरा टप्पा सुरु होण्याच्या आधीच रेल्वे मंत्र्यांशी बोलले असते आणि एक दोन दिवसांचा ब्रेक घेऊन सगळे कामगार जिकडचे तिकडे रेल्वेने नेऊन घातले असते तर या मजुरांची इतकी परवड झाली नसती आणि असा एकाच वेळी १६ मजुरांचा किड्या मुंग्यांसारखा जीवही गेला नसता, पण ते त्यावेळी बोलले नाहीत. विशेष म्हणजे यावेळी ते बोललेच नाहीत . दरम्यान ते दोनदा आले तेंव्हा नुसत्याच गप्पा मारून गेले . काल परवाही बुद्ध जयंतीच्या वेळी बुद्धाचे मोठे तत्वज्ञान सांगितले आम्ही आमच्या समाजातील शेवटच्या लोकांची काळजी घेतोय हे आवर्जून तर सांगितले शिवाय आम्ही आता जगाची मदत करतोय असेही ठोकून दिले याला तुम्ही ठामपणे सांगितले  असे समजा. नेता असावा तर असा .

एक तर देशाचा पालक म्हणून राजगादीवर बसलेला माणूस जेंव्हा असा नियोजनशून्य , भोंगळा , नेकेड…असा  सातत्याने व्यवहार करतो तेंव्हा आता भाजपकडे कोणी अटलबिहारींसारखा तोडीचा नेताही नाही कि , जो या मोदींना गुजरातच्या वेळेसारखी राजधर्माची आठवण करून देईल . या माणसाला आवरणारा  एक माणूस आहे नागपूरच्या रेशीम बागेत पण ” मुलगा सांगितलेले ऐकेल कि नाही ? ” या चिंतेमुळेही कदाचित शहाणा बाप जसा मुलाचे शंभर गुन्हे धोतरात गुंडाळतो तसा  हा प्रकार असावा. दुसरे या माणसाने संघाच्या अनेक सुप्त इच्छा हस्ते -परहस्ते पूर्ण केल्यामुळेही कदाचित हे लांगुलचालन चालू असेल. शिवाय आणखी एक -दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत त्या एकदा उरकून घेऊ आणि काम झाले कि मग देऊ सोडून मोकळे  असेही बहुतेक रेशीमबागेला वाटत असावे.

खरे तर आपल्याकडे कुठल्याही व्यक्तीवरचे प्रेम हे एक व्यसन आहे , दारू , सिगारेट , तंबाखू , गुटख्याचे असतेना अगदी तसे !!  आणि जसा या  उत्पादनावर  वैधानिक इशारा दिलेला असतो ना,  तरीही लोक या अंमली पदार्थाचे सेवन करतात तसे हे व्यसन आहे , जे देशातील अनेक लोकांना जडले आहे. आता त्यावर कितीही बंदी आणा किंवा अमुक हा  माणूस  देशासाठी योग्य नाही,  त्याच्यापासून सावध राहा असा कितीही संवैधानिक इशारा दिला तरी त्याच्या व्यसनाने वेड्या झालेल्या लोकांना काहीही फरक पडत नाही. माणसं मेली तरी त्यांचे हे जीव घेणे व्यसन सुटत नाही. हे व्यसन सोडल्याशिवाय गत्यंतर नाही. हे या निमित्ताने समजून घेण्याची गरज आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आल्यानंतर कुठल्याही नियोजनाविना , कोण कुठे आहे ? याचा विचार केल्याविना आणि याचा परिणाम काय होईल याचीही काळजी कारण्याविना देशातील सव्वासो करोड जनतेचे परम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही वर लाईव्ह येऊन मित्रो , म्हणून लॉकडाऊनची घोषणा केली आणि  लोक जिथल्या तिथे थांबले . याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र , दिल्ली , गुजरात , तेलंगाणा , आंध्रप्रदेश , कर्नाटक या राज्यात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना बसला . कंपन्या बंद झाल्या, राहण्याची , जेवण -खाण्याची सोया गेली आणि हे सर्व मजूर सैरभैर झाले . आपल्या राज्यात आपल्या घरी जाण्याच्या  ओढीने व्यथित झाले . जेंव्हा ते बाहेर निघायचा प्रयत्न करू लागले तेंव्हा पोलिसी बळाचा वापर करून सीमेवरच डांबले . विशेष म्हणजे त्यांच्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सीमा बंद केल्या. त्यामुळे लोक वाहनांचा नाद सोडून शेकडो , हजारो मैल आपल्या कुटुंबकबिल्यासहीत पायी निघाले. त्यातूनच करमाडची हि हृदयद्रावक घटना घडली.

दरम्यान लोकनिंदा नको म्हणून मोदीही आज पहिल्यांदा या विषयावर पुढे येऊन ट्विट्द्वारे  बोलले .रेल्वेमंत्री  बोलले , गृहमंत्री बोलले . जे मध्य  प्रदेशचे मुख्यमंत्री आपल्याच लोकांना आपल्या घरात घ्यायला तयार नव्हते त्यांनी या १६ मजुरांच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांनी भरलेले हे एक खास विमान औरंगाबादला पाठवले. या मजुरांच्या डेड बॉडीला ख्याली खुशाली विचारली , मुख्यमंत्र्यांनी तिकडून पाच लाखाची घोषणा करून टाकली आणि त्यांचे शव जबलपूरला इतर १२०० प्रवाशांना घेऊन रात्री ११ वाजता औरंगाबादहून जबलपूरकडे जाणाऱ्या खास रेल्वेगाडीने भोपाळला घेऊन गेले !!  किती हि उदारता आणि आपल्या मजुरांप्रती किती हि तळमळ ? हीच तळमळ त्यांनी आधीच दाखवली असती तर या मजुरांवर हि वेळ आलीच नसती .

सरकारने आता सर्वच कामगारांना आपापल्या राज्यात घेऊन जाण्याच्या कारवाईला खरे तर सुरुवात केलेली आहे पण त्यासाठी ज्या डिजिटल अटी आणि शर्ती टाकल्या आहेत त्या या मजुरांच्या जिवापेक्षा भारी आहेत. म्हणजे तुम्ही सरकार म्हणून त्यांना जी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक पाठवली आहे ती भरण्यासाठी स्मार्ट फोन , फोनमध्ये नेटवर्क कुठे आहे सरकार ? तुम्हाला इतकीही अक्कल असू नये म्हणजे हि गोर गरीब जनतेची थट्टाच नव्हे तर काय म्हणावे ? सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत त्यांना , बस स्टॅन्ड , रेल्वे स्टेशनवर येऊ द्या ना , आणि जा घेऊन त्यांना तपासून आपापल्या गावात. जर या व्यक्ती कोरोना बाधित आधल्या तर ठेवा इकडेच रुग्णालयात पण बरे होताच त्यांची जायची व्यवस्था करा . जशी   तुम्ही श्रीमंत लोकांसाठी विमानांची सोया करताय तशी….इतकेच या कामगारांच्या , मजुरांच्या , श्रमिकांच्या वतीने मागणे आहे . आणि माध्यमांची टीका पॉझिटिव्हली घ्यायला शिका. देशभरातील सगळा मीडिया  तुम्हाला महिनाभरापासून मजुरांचे हे करून चित्र दाखवत आहे पण तुमच्या डोळ्यांना गरिबांचे हे हाल दिसत नाहीत. ते तुम्ही पहावेत हाच या १६ मयत झालेल्या कामगारांचा शोक संदेश आहे. सरकार कुंभकर्णी झोपेतून वेळीच जागे व्हा. अन्यथा तुमच्या सारख्या धूर्त लोकांचे हे गोर गरीब मजूर थेट काही नुकसान तर करणार नाहीत पण तुम्हाला दुवाही देणार नाहीत. ज्याची तुम्हाला खूप गरज आहे .

बाबा गाडे , ज्येष्ठ पत्रकार औरंगाबाद

आपलं सरकार