#CoronaVirusEffect : AurangabadNewsUpdate : मनपा प्रशासक पांडे, जिल्हाधिकारी चौधरी, विभागीय आयुक्त केंद्रेकर, पोलीस आयुक्त का फिरताहेत रस्त्यावर … ?

Spread the love

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील बहुतेक रेड झोन मध्ये असलेले जिल्हे ग्रीन झोनमध्ये आणा असे आवाहन केल्यांनतर औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी  उदय चौधरी, मनपा प्रशासक उदय चौधरी आणि पोलीस आयुक्त आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी रस्त्यावर उतरून थेट लोकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. काल दिवसभरात आणि रात्री स्वतः विभागीय आयुक्त यांनी  हातात माईक आणि भोंगा घेऊन औरंगाबादकरांना सोशल डिस्टंसिंग आणि घरात राहणे का आवश्यक आहे याचे महत्व सांगून लोकांच्या दारोदार जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तर आज संजय नगर , मुकुंदवाडी भागातील कनेन्टमेन्ट क्षेत्रात जाऊन लोकांच्या मनातील कोरोनाची भीती काढून अनेक प्रश्नांना खुलेपणाने उत्तरे दिली. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल , आ. अंबादास दानवे मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

आयुक्तांनी सोडला १५ दिवस चहा ….

संजय नगर मुकुंदवाडीतील लोकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी उदयकुमार चौधरी यांनी कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याबद्दल सूचना दिल्या. दरम्यान महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी १५ दिवस चहा आणि भाजी खाणे सोडल्याचा संकल्प केला. त्यापूर्वी पांडे हे सांगत होते कि सध्याचा काळ खूप वाईट आहे . चहा , दूध , भाज्या रोज मिळाल्या नाही तर त्यासाठी बाहेर जाऊ नका . काही दिवस हे नाही खालले तर काहीही फरक पडत नाही . मी स्वतः तुमच्याबरोबर १५ दिवस चहा घेणे आणि भाजी खाणे सोडून देतो. काहीही करून आपणास आपली काळजी घायची आहे आणि औरंगाबाद शहर ग्रीन झोनमध्ये पूर्ववत आणायचे आहे त्यासाठी आपण सर्व जण प्रशासनाला साथ द्या असे आवाहन केले.

काल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर , महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी जयभीम नगर येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना केंद्रेकर म्हणाले कि , कोरोनाला गांभीर्याने घ्या, या रोगावर इलाज नाही . आपल्या शहरातील मरण पावलेल्या रुग्णांचे वय पाहता कोरोना केवळ वृद्धांनाच नव्हे तरुणांनाही मृत्यू आला आहे तेंव्हा सावध राहा. तरुणांनो बाहेर फिरून स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका. एकमेकांशी थेट संपर्क साधने सोडा , तोंडाला मास्क बांधा , कोरोना असो , नसो स्वतःची काळजी घ्या. प्रसंग युद्धाचा आहे , समजून घ्या . काही गोष्टी मिळतील काही गोष्टी मिळणार नाही तर सहन करा. आपल्याला १५ दिवसात आपला मोहल्ला ग्रीन झोनमध्ये यायचं आहे . ज्यांना कोरोना झाला आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका. हा रोग कुणालाही होऊ शकतो. यावेळी शहर अभियंता श्री एस डी पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची देखील उपस्थिती होती.

पोलीस आयुक्तांनी केला वेळेत बदल 

दरम्यान आज पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सायंकाळी सुधारित आदेश जारी केले असून या आदेशानुसार उद्यापासून सम तारखेत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.  नवीन आदेशानुसार दुकाने आणि जीवनावश्यक सुविधा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू राहतील. तर वैद्यकीय सुविधा , अत्यावश्यक सेवा , आस्थापना , परवानगी देण्यात आलेले उद्योग व्यवसाय, राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी , कर्मचारी , पेट्रोल पंप , एलपीजी गॅस, दूध व दूध डेअरी वाहतूक विक्री, हे सम – विषम तारखेला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत आणि स्वस्त धान्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत चालू राहणार आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासन खंबीरपणे योद्ध्यांच्या पाठिशी – जिल्हाधिकारी उदय चौधरी

कोरोना (कोविड) विरुद्धच्या लढ्यात लढा देत असलेल्या प्रत्येक डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आदींसह सर्वच कोरोना योद्ध्यांच्या खंबीरपणे प्रशासन पाठिशी आहे. कोरोना योद्धे मागील दीड महिन्यापासून अहोरात्र समाजाची सेवा करताहेत, ही भूषणावह बाब असल्याची भावना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केली.
जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज भेट देऊन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, औषध निर्माण अधिकाऱ्यांशी सोशल डिस्टसिंगचे पालन करत संवाद साधला. त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. शिवाय कोरोना लढ्यात करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शनदेखील केले. कोरोना विरुद्धच्या लढ्यात कोरोना योद्ध्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे, हा लढा आपण तुमच्या विश्वासावर जिंकून दाखवूच, असा विश्वासही कोरोना योद्ध्यात निर्माण केला. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक करत श्री. चौधरी यांनी प्रोत्साहनही दिले.

 

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.