Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Maharashtra : CoronaEffect : “त्या ” दोन पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखाची मदत आणि शासकीय नोकरी : गृहमंत्री अनिल देशमुख

Spread the love

राज्यातील पोलीस आणि आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धा बनून विषाणूशी लढत असून या लढ्यात मुंबईतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. सरकार त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे. दोन्ही पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरी, तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलिसांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.

करोना विशेष कक्ष आणि नोडल अधिकारी

करोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र करोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर, महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. करोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी यावेळी केले.

वाधवान प्रकरणी चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक

दरम्यान वाधवान प्रकरणाबद्दल अधिक माहिती देताना गृहमंत्री म्हणाले की, आज, रविवारी दुपारी साडेतीन वाजता सातारा पोलीस अधीक्षकांनी धीरज व कपिल वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिले. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. या कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते, त्याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सैनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, तो अहवाल रीतसर माझ्याकडे येईल आणि पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावर योग्य तो निर्णय होईल. या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे. तसेच या चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!