Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : विद्यापीठात सुरु होताहेत कोरोनाच्या टेस्टिंग प्रयोगशाळा, परीक्षांबाबत युजीसी घेणार निर्णय

Spread the love

राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कोरोनाच्या टेस्टिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. आतापर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले असून ते लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापरले जाणार आहे. एसएनडीटी विद्यापीठामध्ये ‘जीवनरक्षक’ कोर्सची निर्मिती करण्यात येत असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत करू शकतील. हा अभ्यासक्रम आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना देईल,  असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

सामंत यांनी आज सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला आणि विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचा आढावा घेतला. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांने आपत्कालीन निधीतील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड-१९ साठी देऊन सहकार्य करावे असे, आवाहन सामंत यांनी केले. राज्यातील करोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही

दरम्यान  विद्यापीठातील परीक्षांच्या संदर्भात बोलताना , सामंत म्हणाले कि , विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात समिती नेमली आहे, आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल. सर्व विद्यापीठांची आपापल्या पातळीवर परीक्षा घेण्याची तयारी झालेली आहे. ऑनलाईन अध्यापन सध्या सुरू असून ऑनलाईन  परीक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाईल तसेच परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. अभय वाघ, विद्यापीठीय परीक्षेसंदर्भात गठीत समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सहभाग घेतला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!