Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : चिंताजनक : राज्यातील ५३ पत्रकारांना कोरोना , त्यांच्या संपर्कातील लोकांचा तपास चालू…

Spread the love

राज्यात कोरोनाचा कहर चालू असतानाच वार्तांकन करणाऱ्या मुंबईतील ५३ पत्रकारांना करोनाची लागण झाल्याचे  चिंताजनक वृत्त आहे. दरम्यान या सर्वांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. त्याचवेळी या पत्रकारांच्या कुटुंबीयांचीही  तपासणी केली जाणार आहे तसेच हे पत्रकार ज्या इमारतींत राहतात त्या इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण करून इमारती सील करण्याची कारवाई पालिकेच्या पथकांकडून सुरू करण्यात आली आहे. प्रतीक्षानगरमध्ये पत्रकारांचे वास्तव्य असलेली एक इमारत कंटेनमेंट एरिया म्हणून जाहीर करत आज दुपारनंतर सील करण्यात आली आहे. या इमारतीतील सर्व नागरिकांना  पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत करोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार होत असताना आता कोरोनाचे कव्हरेज करणाऱ्या माध्यमांमधील पत्रकार आणि कॅमेरामन्सनाही करोना साथीने गाठले आहे. माध्यम प्रतिनिधींसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यापक तपासणी मोहिमेनंतर आता अहवाल प्राप्त झाले असून त्यात मुंबईतील पत्रकार व कॅमेरामन्स मिळून ५३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध पत्रकार संघटनांच्या विनंतीवरून मुंबई महापालिकेच्या वतीने माध्यम प्रतिनिधींसाठी करोना चाचणी मोहीम घेण्यात आली होती. पालिकेच्या आरोग्य पथकाने एकूण १६८ जणांचे स्वॅब नमुने घेतले होते. यापैकी बहुतांश नमुन्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यात ५३ जणांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आढळले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. करोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर व पत्रकारांचा समावेश आहे. यात ज्यांच्यात तीव्र लक्षणे आहेत त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर सौम्य लक्षणे असलेल्या बाकी सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान पत्रकारांना करोना झाल्याची बातमी चिंता वाढवणारी असून पत्रकार अत्यावश्यक सेवेत येतात. ते स्वत:चा जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असतात. त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंना ५० लाखाचा विमा सरकारने द्यावा, अशी विनंती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!