Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#BandraStationCrowed : रेल्वे प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्याची खा. संजय राऊत यांची मागणी

Spread the love

मुंबईच्या वांद्रे स्टेशनबाहेर झालेल्या पर प्रांतीय मजुरांच्या गर्दीला रेल्वे विभागही तितकाच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते व प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केला असून महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयावरही गुन्हा दाखल करायला हवा, असे माझे मत असल्याचे म्हटले आहे. पर प्रांतीय मजुरांना आपापल्या गावी जाता यावे म्हणून रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत, अशाप्रकारचे वृत्त १४ एप्रिल रोजी पसरले होते. या चुकीच्या वृत्तामुळे आधीपासूनच आपल्या गावी जाण्यासाठी आतुर असलेल्या हजारो मजुरांनी अचानक वांद्रे स्टेशनबाहेर गर्दी केली. त्यामुळे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले.

या प्रकारानंतर सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचवेळी हा जमाव केल्याप्रकरणी १० जणांना अटक करताना त्यासोबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनाही पोलिसांनी अटक केली. विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत, असे चुकीचे वृत्त दिल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली. दरम्यान, आज राहुल कुलकर्णी यांना जामीन मिळाला असून त्यावर प्रतिक्रिया देताना खा.  संजय राऊत यांनी रेल्वेलाही जबाबदार धरले. दरम्यान वांद्रे येथे जे काही घडले त्याला रेल्वेही तितक्याच प्रमाणात जबाबदार असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयावरही गुन्हा दाखल करायला हवा, असे माझे मत असल्याचे राऊत म्हणाले.

सरकार आणि माध्यमं हे लोकशाहीचे दोन प्रमुख स्तंभ आहेत. त्यामुळेच जे काही घडले त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दोन्हीकडून काळजी घेण्याची गरज आहे. तूर्त कुलकर्णी यांना जामीन मिळाला याचा मी आनंद व्यक्त करेन. आता त्यांना ज्या कारणामुळे अटक झाली त्याच्या मुळाशी जाऊन सत्य समोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असे राऊत यांनी नमूद केले. मी शिवसेना नेता म्हणून नाही तर एक पत्रकार म्हणून ही भूमिका मांडत आहे, असेही राऊत म्हणाले. राऊत यांनी संबंधित वृत्तवाहिनीकडे ही प्रतिक्रिया नोंदवली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!