Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : पुण्यातील बळींची संख्या ३४ वर , मास्क न वापरणारांना १०० रुपये दंड , २२ ठिकाणे सील करण्याची महापालिका आयुक्तांची मागणी

Spread the love

देशासह राज्यभरात करोनाचे थैमान सुरूच आहे. पुण्यात करोनाबाधितांसह मृत्यूंची संख्या वाढत आहे. आज शहरात करोनाने दोन बळी घेतले. याचबरोबर करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३४ वर पोहचला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये नाना पेठेतील ४० वर्षीय पुरूषासह कोंढवा खुर्द येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोघांनाही अन्य आजार देखील होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. दरम्यान शहारात दिवसेंदिवस करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुणे शहरातील २२ ठिकाणं सील करण्यात यावीत अशी महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज (सोमवार) दिल्या. करोनाच्या संसर्गामुळे सध्या लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा ऑनलाइन सेवेद्वारे आवश्यक गोष्टी मागवण्याकडे कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवन येथे या सेवा देणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता ऑनलाइन सेवा देताना जीवनावश्यक वस्तू, अन्न, फळे, भाजीपाला यांचाच अंतर्भाव असावा. ज्या संस्थांकडे औषध सेवा पोच करण्याचा परवाना असेल त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषधे देण्याची व्यवस्था करावी. सेवा देणा-या डिलीव्हरी बॉयना जे पास दिले आहेत त्याचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घ्यावी.””ज्या क्षेत्रासाठी पास असेल त्या क्षेत्राबाहेर सेवा देऊ नयेत. डिलिव्हरीसाठी वाहनांची संख्या ही मर्यादित ठेवावी. सील केलेला भाग अथवा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सेवा देऊ नयेत. त्याचप्रमाणे सील केलेल्या भागात राहणाऱ्या डिलीव्हरी बॉयना डिलिवरीसाठी परवानगी दिली जाणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या नागरिकाला १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे कॅम्प भागात हा नागरिक फिरत होता. या पुणेकराविरोधात ११ एप्रिलला FIR दाखल करण्यात आला होता. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गाडीवरुन फिरत होता. त्या प्रकरणी त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. तसंच मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे ही दोन्ही शहरं रेड झोनमध्ये आहेत. अशात मास्क घातला नाही तर कारवाई होईल असं पुणे आणि मुंबई महापालिकेने आधीच सांगितलं आहे. त्यामुळे त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!