Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : पुणेकरांची चिंता आणखी वाढली पाच तासात दोन तर एकूण ३१ जणांचा मृत्यू , नाशिकमध्ये १३ आणि नागपुरात १४ नवे रुग्ण आढळले …!!

Spread the love

देशातील करोना रुग्णांची संख्या ८,३५६ वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या २७३ झाली आहे.

गेल्या २४ तासांत ३४ जणांचा मृत्यू  :  केंद्रीय आरोग्य मंत्रालय

पुण्यात करोनावर उपचार घेत असताना गेल्या पाच तासांत दोन महिलांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१वर गेली आहे. या शिवाय आज नाशिकमध्ये १३, नागपूरमध्ये १४ आणि भिवंडीत करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात सकाळपासून गेल्या पाच तासात दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ५८ वर्षाच्या महिलेला ९ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेला लठ्ठपणा स्लिप अपनिया आणि रक्तदाब असा आजार होता. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसरी ५६ वर्षीय महिला सोमवार पेठेत राहत होती. तिला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. तिला रक्तदाबाचा त्रास होता. सकाळी तिचे अवयव निकामी झाल्यामुळे तसेच करोनाची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे ससूनमधील मृतांची संख्या २२ झाली असून पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान पुणे  शहरातील रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये नर्सिंग विभागाच्या मुख्य परिचारिकेला करोना झाल्याचे  आज स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या आणखी ३० परिचारिकांना क्वारंटाइन करण्यात आले  आहे. करोनाबाधित परिचारिकेला दोन दिवसांपूर्वीच ताप आला होता. तिची वैद्यकीय तपासणी केली असता, करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. ही परिचारिका ५० वर्षीय असून, तिच्यावर रुबीमध्येच उपचार करण्यात येत आहेत. तिच्यासोबत काम करणाऱ्या आणखी ३० परिचारिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ‘सुमारे तीस परिचारिकांना क्वारंटाइन केले आहे. त्यांच्यापैकी काही मुख्य परिचारिकेच्या संपर्कात आल्याने त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. करोनाचा संसर्ग झालेल्या परिचारिकेचा थेट रुग्णांशी संपर्क नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. इतर परिचारिकांना क्वारंटाइन केले आहे, असं रुबी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये १३ नवे रुग्ण 

दरम्यान, नाशिकमध्ये करोनाचे १३ नवे रुग्ण सापडले आहेत. हे सर्वजण आधीच्या करोना रुग्णांच्या संपर्कातील असून हे १३ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते? याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच या १३ही जणांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच मालेगावमधील करोना रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली आहे.

नागपूरमध्ये आज करोनाचे १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील ८ नमूने मेडिकल आणि ६ नमूने मेयोत तपासले गेले. त्यापैकी मेयोत उपचार घेत असलेले चार जण मरकझशी निगडीत आहेत. बाकी दोन सहवासात आल्याने लागण झाली. भिवंडीतही आज करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा ६५ वर्षीय करोना रुग्ण मुंब्र्यात जमातच्या एका कार्यक्रमात गेला होता. तिथून आल्यानंतर त्याची टेस्ट केली असता त्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या घटनेनंतर या व्यक्तीच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्या घरापासूनचा एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!