Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६३५ , एकट्या मुंबईत २२ मृत्यू तर ३३० जणांना कोरोनाची लागण

Spread the love

देशाबरोबर महाराष्ट्रातही  कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या आज ६३५ वर पोहचली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून ५२ जण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रात मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या तब्बल ३३० इतकी झाली आहे. एकट्या मुंबईतच करोनाने २२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई हा या साथीचा केंद्रबिंदू ठरला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन ५२ रुग्ण आढळले आहेत तर आज चार जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आज ज्या चार जणांचा मृत्यू झाला आहे त्यात एक व्यक्ती वृद्ध होती तर अन्य तिघांना विविध शारीरिक व्याधींनी ग्रासलेले होते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

दरम्यान, वरळी कोळीवाडा, धारावी या दाट लोकवस्तीच्या भागांत करोनाचे रुग्ण आढळत असल्याने पालिकेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. करोनाचा शिरकाव झोपडपट्ट्या आणि दाटीवाटीच्या ठिकाणी होत असल्याने पालिकेने या परिसरात कंटेनमेंट झोन तयार केले आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये करोनाचा आणखी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून १० ठिकाणी ‘करोना कोविड’ विषयक पडताळणी दवाखाने सुरू केले आहेत. त्यामुळे क्लस्टर कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याचा प्रश्न येणार नाही.

नितीन राऊत यांचे आवाहन , दिवे लावताना सॅनीटायझरचा वापर करू नका 

करोनाविरुद्ध लढ्यात भारत एकजूट आहे, याचे दर्शन अवघ्या जगाला घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रविवारी रात्री ९ वाजता आपल्या घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे घरात वा खिडकीत दिवे लावण्याचे आवाहन केले असून महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्याबाबत आणखी एक सूचना नागरिकांना केली आहे. करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्या रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाईट बंद करून दिवे लावा, असे सांगितले आहे. मात्र हाताला सॅनीटायझर लावून दिवे वा मेणबत्ती लावल्यास त्यात असलेल्या अल्कोहमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सॅनिटायझर लावून दिवे लावू नका, सावधगिरी बाळगा, असे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी आज केले.

एकाचवेळी सर्वत्र लाईट बंद केल्यास देश अंधारात बुडण्याचा धोका आहे, असे विधान राऊत यांनी शुक्रवारी केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा आपला आक्षेप नोंदवताना अतिउत्साहाच्या भरात जनतेच्या जिवाशी खेळ होऊ घातला आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. जनतेने लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवावे, गर्दी करू नये,कोणत्याही परिस्थितीत उत्सवाचे स्वरूप येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही राऊत यांनी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!