#CoronaVirusUpdate : सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच कोरोना पॉझिटिव्ह , राज्यातील संख्या ११२ तर देशात ११ बळी

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली असून सांगलीतल्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सांगलीतील करोना रुग्णांची संख्या ९ वर तर राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११२ वर पोहोचली आहे. इस्लामपूर येथे दोन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्याचं सोमवारी उशिरा स्पष्ट झालं होतं. हे चारही जण हजहून आले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाला घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले होते. तसेच बसस्थानकावरून शहरात येणारा मुख्य रस्ता, गांधी चौक परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले होते. त्यानंतर प्रशासानाने त्यांच्या कुटुंबाशी निगडीत ३९ लोकांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन केले होते. प्रशासनाने सुमारे २५० लोकांना होमक्वारंटाइन केले होते.
दरम्यान, निगराणीखाली असलेल्या या ३९ जणांपैकी ५ जणांचे रिपोर्ट आले असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हे पाचही जण एकाच कुटुंबातील आहे. हे लोक आणखी किती लोकांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात आहे. सांगतलीतील करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात असून नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगलीच्या इस्लामपूरमधील ९, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तर देशात आतापर्यंत करोनाचे ११ बळी गेले असून त्यापैकी मुंबईतल्या चौघांचा त्यात समावेश आहे.
साताऱ्यातही महिलेला निघाला कोरोना
सातारा येथील विलगीकरण कक्षात रविवारी दाखल केलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. खोकला असल्यामुळे रविवारी रात्री उशिरा संशयित म्हणून सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलाच्या घशातील द्रवाचा (स्वॅब) रिपोर्ट पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आला होता. एनआयव्हीकडून रिपोर्ट प्राप्त झाला असून, ही महिला कोविड-१९ बाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या महिलेला मागील पंधरा वर्षांपासून उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून, प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.