Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Maharashtra #CoronaVirusUpdate : राज्यात पुन्हा कर्फ्यू लागू , सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद , घराबाहेर न पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Spread the love

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल  उचलले असून राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी रविवारी जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिला. मात्र, यासोबतच अनेक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हे होते, हे ध्यानात ठेवा, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी राज्यात आज जमावबंदीचा आदेश मोडणाऱ्या सर्वांनाच फैलावर घेतले. आज अनेक भागांत लोकांनी रस्त्यावर उतरून विनाकारण गर्दी केल्याचे तसेच वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळेच राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मला घ्यावा लागत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

करोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे. मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सूचना देत आहे. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगभरात जसे सुरू आहे तसेच थैमान महाराष्ट्रात होईल, अशा धोक्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार  खासगी वाहने अत्यावश्यक कारण असेल तरच सुरू राहतील. रिक्षा, टॅक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल. कालपासून इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या आजपासून राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करण्यात येत आहेत. या वाहतूक बंदीत खासगी वाहने देखील आली. देशांतर्गत विमानसेवा तत्काळ बंद करावी अशी विनंती पंतप्रधानांना करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरू राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरू राहील. सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे पूर्णपणे बंद राहतील. आशा, अंगणवाडी, होमगार्ड्स यांना देखील वैद्यकीय बाबतीत प्रशिक्षण देऊन सज्ज करण्यात येत आहे. सर्व माध्यमांनी करोनाविषयी जनजागृती करावी. ज्यांना करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. घरी विलगीकरण केलेल्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!