Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : चिंताजनक : देशात ३२४ तर महाराष्ट्रात ७४ रुग्ण , कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू , इटलीत हाहा:कार चालूच …

Spread the love

देशात सर्वत्र काळजी घेतली जात असतानाच राज्यात आज करोनाचे आणखी दहा रुग्ण आढळले असून  त्यापैकी सहाजण मुंबईचे असून चारजण पुण्याचे आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६४ वरून ७४ वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यात काल ६४ रुग्ण होते. परंतु आज पुन्हा दहा रुग्ण आढळल्याने हा आकडा ७४ वर गेल्याचं टोपे यांनी सांगितलं. या १० रुग्णांपैकी पाच रुग्ण हे परदेशातून आलेले असून इतर पाच रुग्णांना संपर्कामुळे करोनाची लागण झाल्याचं टोपे यांनी सांगितलं. पुण्यात चार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रुग्ण महिलेच्या बहिणीचा पती, तिची बहीण, तिचा मुलगा आणि बहिणीची मुलगी अशा चार जणांचा समावेश आहे. रुग्ण महिलेच्या पती आणि त्यांच्या मुलीला तापाची लक्षणे आहेत. त्यांना खासगी रुग्णालयातून आता नायडू रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.


दरम्यान  एका ६३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मुंबईच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या व्यक्तीला अनेक व्याधी होत्या. त्यातच त्यांना करोनाची लागण झाल्याने ते दगावल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आज आढळलेल्या दहाही रुग्णांच्या संपर्कातील लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन केलं जाणार आहे. त्यांच्या संपर्कातील सर्वांना शोधून त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, राज्यातील करोना रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणांपुढील चिंताही वाढली आहे.

मुंबईत ६३ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आता बिहारमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पटनातील एम्स रुग्णालयात ३८ वर्षीय तरुणावर कोरोनाचे उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील कोरोनाग्रस्त रुग्णाचा हा पहिला आजचा दिवसातला दुसरा तर भारतातील आतापर्यंत 6 वा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२४ वर पोहोचली आहे . पटना इथल्या एम्स रुग्णालयात कोरोनामुळे ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती बिहारच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. शनिवारी हा तरुण कोरोनाबाधित असल्याचं चाचण्यांनंतर समजलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आज देशभरात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाव्हायरस वेगाने पसरतो आहे. काल फक्त २४ तासांत तब्बल ९८ रुग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखी रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३२४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ७४ रुग्ण आहेत.

दरम्यान युरोपियन देश इटलीमध्ये करोनाचा हाहा:कार सुरू आहे. इटलीत एकाच दिवशी ७९३ जणांच्या मृत्यूने जग सुन्न झालं आहे. इटलीत आतापर्यंत ५३ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे, तर ४८०० मृत्यू झाले आहेत. इटलीत २७ फेब्रुवारीला ५८८३ जणांना करोनाची लागण झाली होती, तर २३३ मृत्यू झाले होते. इटली सरकारने वारंवार जनतेला सूचना पाळण्याचं आवाहन केलं आणि त्याकडे दुर्लक्ष होत गेलं. यात सरकारलाही जबाबदार धरलं जातं. त्यामुळे आता इटलीवर लॉकडाऊनची वेळ तर आली आहेच, शिवाय उपचाराअभावी अनेकांचे डॉक्टरांच्या डोळ्यासमोर मृत्यू होत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!