Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : होम क्वारंटाइनच्या रुग्णांना बाहेर फिरल्यास कडक कारवाईचा इशारा…

Spread the love

राज्य शासन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी  प्रभावी उपाययोजना करीत आहेत. ज्यांनी बाधित भागातून प्रवास केला आहे अथवा परदेश प्रवासाचा इतिहास आहे. किंवा बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती आहेत, अशाना होम क्वारंटाइनच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील ज्या व्यक्तींना होम क्वारंटाइनचे आदेश आहेत, त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधित व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून शनिवारी सांगण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी कोरोनाचे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी १ रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आयसीएमआर) प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.

मुंबईत आढळलेल्या ८ रुग्णांपैकी ६ जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहीणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!