Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : मुंबईतील गर्दी कमी न झाल्यास लोकल होईल बंद , महाराष्ट्र ४२ रुग्ण पॉझिटिव्ह

Spread the love

मुंबईतील गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात उपचार सुरू असणाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. सरकारमधील कर्मचारी ५० टक्के यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याची गरज, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. करोना आजार हा बरा होणारा आजार. ८५० लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी ४२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, असल्याचंही ते म्हणाले. ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.

पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. करोना बाधित असलेली ही महिला फ्रान्सहून आली आहे. ती नेदरलँड्सलाही जाऊन आली होती. परदेशातून आल्यामुळं तिची तपासणी करण्यात आली होती. त्यात तिला करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. ही महिला ज्या कारमधून आली होती, त्या कारचालकाला आणि तिच्या घरातील मोलकरणीलाही नायडू रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्या दोघांचीही चाचणी सुरू आहे. पुण्यातील ‘करोना’ग्रस्तांची संख्या ८, तर पिंपरी-चिंचवडमधील ‘करोना’ग्रस्तांची संख्या १० झाली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, करोना विषाणूमुळे नागरिकांमधील भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाळा, कॉलेज, मॉल अशी गर्दीची ठिकाणं काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

एकाच टॅक्सी चालकामुळे पसरला कोरोना व्हायरस 

देशात करोना व्हायरसचे आतापर्यंत १३८ रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत २३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मंगळवारी दुबईहून परतलेल्या ६४ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने त्याच टॅक्सीमधून प्रवास केला होता जिच्यामुळे पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. देशात सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात करोना रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. १ मार्च रोजी पुण्यात स्थायिक असणारे पती-पत्नी आणि मुलगी दुबईहून मुंबईत परतले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांनी पुण्यासाठी टॅक्सी बूक केली होती. पती-पत्नी आणि मुलगी यांना नंतर करोना व्हायरसची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर त्याच टॅक्सीत प्रवास करणाऱ्या अन्य दोन लोकांनी आणि चालकालाही करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. अशा पद्धतीने एकाच टॅक्सीतून प्रवास केल्याने पाच जणांना करोनाची लागण झाली आहे.

मुंबईत राहणारी ६४ वर्षीय व्यक्ती त्याच टॅक्सीने प्रवास करत विमातळावरुन घऱी पोहोचली होती. दुबईहून प्रवास करून ते परतले होते. मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. शाह यांनी सांगितले. दुबईहून ५ मार्चला हा रुग्ण देशात परतला होता. ७ मार्चला त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. हृदयविकार असल्याने कुटुंबीयांनी त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी नेले. ८ मार्चला हिंदुजामध्ये दाखल केले. तपासण्यांमध्ये श्वास घेण्याचा त्रास हा विषाणू संसर्गामुळे होत असल्याचा संशय आल्याने त्यांचे नमुने १२ मार्चला कस्तुरबामध्ये पाठवण्यात आले. चाचण्यांमध्ये करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना १३ मार्चला कस्तुरबामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.

कस्तुरबामध्ये रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याने अधूनमधून कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांना उच्चरक्तदाबासह हृदयविकारही होता. तसेच न्यूमोनिया आणि हृदयाला संसर्ग झाला होता. हृदयाला सूज आल्याने आणि ठोके वाढल्याने सोमवारी संध्याकाळी प्रकृती गंभीर होत गेली. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!