Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५३ , आपापल्या घरी सुखरूप पोहोचले १४ रुग्ण …

Spread the love

देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५३ झाली आहे तर १४ लोक पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी पोहोचले आहेत. तर केवळ तिघांचा मृत्यू झालेला आहे . नोएडामध्ये एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. त्याबरोबरच लखनऊमध्येही एका डॉक्टरलाही करोनाची लागण झाली आहे. नोएडामधील रुग्ण इंडोनेशियाला गेला होता. चारच दिवसांपूर्वी तो परतला होता. नोएडाचा हा   चौथा रुग्ण असल्याची माहिती गौतमबुद्धनगरचे सीएमओ डॉक्टर अनुराग भार्गव यांनी दिली आहे. नोएडाचा हा रुग्ण आपल्या पत्नीसह इंडोनेशियाला फिरायला गेला होता. या रुग्णाचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या पत्नीचीही तपासणी करण्यात आली आहे. पत्नीचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. नोएडामध्ये एकूण २०० लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान  उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे करोनाची लागण झालेला डॉक्टर करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करत होता. या डॉक्टरला करोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्यानंतर त्याची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. सध्या डॉक्टरला वेगळे ठेवण्यात आले आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे करोनाचे २ रुग्ण सापडले आहेत. त्यांपैकी १ रुग्ण हा ६मार्च या दिवशी अमेरिकेहून परत आला होता. तर, दुसरा रुग्ण २५ वर्षीय युवती असून ती स्पेनहून आली होती. दोघांचेही रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले असून त्यांच्यावर स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहेत. कर्नाटकात आतापर्यंत एकूण १३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, तेलंगणमध्ये करोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण सापडला आहे. ब्रिटनमधून आलेल्या या रुग्णाचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले आहेत. तेलंगणमध्ये आतापर्यंत करोनाचे ६ रुग्ण सापडले आहेत. यांपैकी १ रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी गेला आहे.

कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अशी घेतली जाते खबरदारी  

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. करोनाबाबत मृतदेहाचे व्यवस्थापन करताना खबरदारी, संसर्गाला प्रतिबंध, नियंत्रणासाठी उपाययोजना, मृतदेहांची हाताळणी तसेच परिसराचे निर्जंतुकीकरण याबाबत मार्गदर्शक सूचना निर्धारित करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, चाचण्यांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना करोनाच्या चाचण्या करण्याची परवानगी देण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. सध्या केवळ सरकारी प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्या करण्याची क्षमता दुप्पट करण्याची योजना आहे.

दरम्यान मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईतील ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या या दोन्ही कुटुंबीयांना विश्वासात घेऊन सांगण्यात आले. मात्र खबरदारी म्हणून या दोघांनाही अंत्यसंस्कारा प्रसंगी उपस्थित राहण्याची परवानगीही नाकारण्यात आली. त्यामुळे  दोघांनीही विलगीकरण कक्षामध्येच त्यांचे अंत्यदर्शन घेऊन प्रशासनास साहाय्य केले. संसर्ग पसरू नये, यासाठी मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृतदेह विशिष्ट वैद्यकीय आवरणाने झाकण्यात आला. संसर्ग पसरू नये, यासाठी डॉक्टरांनाही आवश्यक ती सर्व काळजी घेण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले होते. खासगी रुग्णालयांमध्येही करोना संशयित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भात पालिकेने चर्चा केली असून या रुग्णालयांनी  कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत सुविधा द्यावी, असे मुंबई महापालिका पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!