Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या “त्या” डॉक्टरलाही झाला कोरोना…

Spread the love

करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला करोना व्हायरसची लागण झाली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. या डॉक्टरने कर्नाटकमधील कलबुर्गी येथील करोना रुग्णावर उपचार केले होते. या रुग्णाचा नुकताच करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. १२ मार्च रोजी झालेल्या या मृत्यूमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. ही व्यक्ती सौदी अरेबियामधून भारतात परतली होती. यानंतर त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. दरम्यान “उपचार करणाऱ्या या डॉक्टरला करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कुटुंबासोबत त्यांच्या घरात बंदिस्त ठेवण्यात आलं आहे. त्यांना लवकरच विलगीकरण कक्षात ठेवलं जाणार,” असल्याची माहिती कलबुर्गीचे उपायुक्त शरत बी यांनी दिली आहे. कर्नाटकमध्ये डॉक्टरसोबत अजून एक करोना रुग्ण सापडला असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत १० जणांना करोनाची लागण झाली आहे.

दरम्यान कर्नाटकात करोनाचे अजून दोन रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या १० वर पोहोचली आहे. युकेवरुन आलेल्या २० वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची  माहिती कर्नाटक सरकारकडून देण्यात आला आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी कर्नाटक सरकारने मॉल्स, चित्रपटगृहे, मैदानं, स्टेडिअम आणि पार्क बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

घरातून काम करण्यास राज्यातील कंपन्यांचा सकारात्मक प्रतिसाद : राजेश टोपे 

दरम्यान करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. गर्दीमुळे हा व्हायरस अधिक पसरण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी अजून कशी कमी करता येईल यावर राज्य सरकारचा भर आहे. आज याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांमध्ये चर्चा झाली. लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, औषध आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. जवळपास २५ कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारकडून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानी द्या, असा प्रस्ताव या कंपन्यांसमोर ठेवण्यात आला. त्यावेळी अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!