Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Update : पुण्यातील रुग्णांची संख्या १६ , रुग्णांशी दुजाभाव करून त्यांच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकणारांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश

Spread the love

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात आज, आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे. तर राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ३३ वर पोहोचला आहे. ही व्यक्ती पिंपरी-चिंचवडमधील आहे. पुणे हे पुरोगामी शहर असून, त्यात रुग्णांच्या नातेवाइकांशी कोणी भेदभाव, दुजाभाव किंवा त्या रुग्णावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.

पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीचा आज चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं पुणे जिल्ह्यात करोनाचे एकूण १६ रुग्ण झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पिंपरी- चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती. त्या व्यक्तीची १४ मार्चला चाचणी करण्यात आली, तिचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

दरम्यान करोनासंदर्भातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. करोनाचे रुग्ण आढळून आल्यानं सगळीकडं भीतीचं वातावरण आहे. करोनाग्रस्त रुग्णांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुजाभावाची वागणूक देत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पुणे हे पुरोगामी शहर असून, रुग्णासोबत त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांशी कुणी दुजाभाव, भेदभाव किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकला तर, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय संबंधित सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत कारवाई करणे अपेक्षित नाही, पण तुम्हीही सहकार्य करा. रुग्ण किंवा कुटुंबीयांना चांगली वागणूक द्या. याबाबत तुम्हीही लोकांना सांगा. सोसायट्यांमध्ये कुणीही रुग्णाविषयी किंवा कुटुंबीयांबद्दल टिप्पणी करू नये, त्यावर आमचं लक्ष राहील, असं त्यांनी सांगितलं.

या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले कि , शहरात काही भागात कलम १४४ लागू करण्याचा विचार असून लवकरच आदेश काढला जाईल. शहरातील भाजीपाला, औषध दुकाने आणि मॉलमधील दैनंदिन खाद्यवस्तूंची विक्री सुरू राहील. ती बंद होणार नाही. शहरात जमावबंदीचे परिसर संध्याकाळपर्यंत जाहीर केले जातील. एमपीएससी परीक्षांबाबत लवकरच  एमपीएससीकडून वेळापत्रकातील बदल जाहीर केली जातील. संबंधित विद्यार्थ्यांनी ते वेळापत्रक पहावे. कोणीही गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करू नये. मला मोबाईलवरून चुकीची माहिती दिलेल्या एकाविरुद्ध मी स्वतः एफआयआर दाखल केला आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनीही विनाकारण बाहेर फिरू नये.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!