Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Effect : ३६ तासांत ७ नव्या देशांत करोनाची लागण, अमेरिकेत आणीबाणीची घोषणा…

Spread the love

जगभरात करोनामुळे  ११० हून अधिक देशांत आतापर्यंत १,३८००० लोकांना करोनाची लागण झाली असून ५,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमध्येच ३१८० लोकांचा करोनाने बळी घेतला आहे. तर इटलीत करोनामुळे १ हजार लोक दगावले आहेत. गेल्या ३६ तासांत ७ नव्या देशांमध्ये करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. समाधानाची बाब म्हणजे ५१.२ टक्के लोक करोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. दरम्यान चीनपाठोपाठ  अमेरिकेतही करोना व्हायरसने हातपाय पसरल्याने अमेरिकन प्रशासन हादरून गेलं असून अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणीबाणीची घोषणा केली असून करोनाचा मुकाबला करण्यासाठी ५० अब्ज डॉलरची ( ५ हजार कोटी) तरतूद केली आहे. या आधी करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी स्पेननेही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. आणीबाणीची घोषणा करतानाच हा व्हायरस रोखण्यासाठी रात्र न् दिवस काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं. आणीबाणी जाहीर केल्याने नॅशनल एमर्जन्सी अॅक्ट अंतर्गत आरोग्य विभागाचा अधिकाधिक बजेट हा आजार रोखण्यासाठी वापरता येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

करोना व्हायरस रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील १५ कोटी लोक या व्हायरसच्या कचाट्यात सापडू शकतात, अशी भीती ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे ट्रम्प यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. ‘येणाऱ्या काळात देशवासियांना मोठी किंमत मोजावी लागेल. आता त्याग केला तर येणाऱ्या काळात त्याचा फायदाच होईल, असं सांगत येणारे आठ आठवडे संकटाचे असतील. अमेरिकेत आतापर्यंत ११००हून अधिक लोकांना करोनाची लागण झाली असून ४० लोकांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या व्हायरसचे अमेरिकेसारख्या विकसित आणि सुविधा संपन्न देशासमोरही आव्हान निर्माण झालं आहे,’ असं ट्रम्प यांनी सांगितलं. तसेच अमेरिकेतील सर्व राज्यांना करोनाचा मुकाबला करण्यासाठी आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान जगभरात करोना व्हायरसची दहशत असताना अमेरिकेतून धक्कादायक बाब समोर आली आहे. ब्राझिलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांचे माध्यम सचिव फेबियो वॅनगार्टन यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच फेबियो हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन आले आहेत. नुकतंच कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्याने खळबळ माजली होती. त्यातच ही बाब समोर आली आहे. काही वृत्तांनुसार, फेबियो आणि ट्रम्प यांनी भेटीदरम्यान हस्तांदोलन करत भेट घेतली. ट्रम्प यांनी त्यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानी आयोजित केलेल्या डीनरला फेबियो यांची उपस्थिती होती. या भेटीचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यात फेबियो ट्रम्प यांच्यासोबत दिसत आहेत.

व्हाईट हाऊसकडून या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. करोनाची लागण झालेल्या व्यक्तीसोबत अमेरिकेचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचा वैयक्तिक कोणताही संवाद नव्हता. त्यामुळे या दोघांची सध्या तरी चाचणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. व्हाईट हाऊसचा वैद्यकिय विभाग आणि सिक्रेट सर्व्हिस दोन्ही नेत्यांच्या प्रकृतीसाठी योग्य ती काळजी घेत आहे. व्हाईट हाऊसचा प्रत्येक कर्मचारी सुखरुप असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!