Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोना आणि चिकनच्या अफवांमुळे झाले ६०० कोटींचे नुकसान , अफवा पसरवणारे दोन जण पोलिसांच्या रडारवर…

Spread the love

करोनाच्या अफवांमुळे या व्यवसायाचे आतापर्यंत साधारणपणे रुपये सहाशे कोटी इतके नुकसान झाले आहे. चिकन खाल्ल्यामुळे जगभरात करोना व्हायरसची लागण होते, ही अफवा पसरवणारे दोघे आता ट्रॅक झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पावलं उचलण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. चिकनचा संबंध कोरोनाशी सावणाऱ्या अफवेमुळे सध्या चिकनची मागणी घटली आहे. यामुळे पोल्ट्री इंडस्ट्रीला घरघर लागली आहे.

या बाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी लोकसत्ताला बोलताना सांगितले की, या अफवांचा एकूणच पोल्ट्री इंडस्ट्रीवर परिणाम झाल्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तांनी पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. हे मेसेज दोन आयपी अॅड्रेसवरून फॉरवर्ड करण्यात आले होते आणि त्यातला एक उत्तर प्रदेशातला व दुसरा आंध्र प्रदेशातला आहे असे पोलिसांना आढळून आलं आहे. “हे लोक कोण आहेत याबाबत शोध सुरू आहे. जगभरात संशोधनाअंती असे लक्षात आले आहे की चिकनचे सेवन केल्यामुळे पसरत नाही,” असे केदार यांनी सांगितले. केदार म्हणाले की, करोनाच्या अफवांमुळे या व्यवसायाचे आतापर्यंत साधारणपणे रुपये सहाशे कोटी इतके नुकसान झाले आहे. चिकनची मागणी आणि किमती कमी होत आहेत आणि कोंबड्यांना दिले जाणारे खाद्य जसे की मका वगैरे यांची मागणीसुद्धा घटली आहे. याचा थेट परिणाम बँकांकडून पोल्ट्री व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर आणि वीज बिलांच्या भरण्यावर होईल. पोल्ट्री व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती सुद्धा होते कारण साधारणपणे दोनशे पक्षांच्या मागे सहा जणांची गरज असते, असे केदार म्हणाले.

दरम्यान २००६ मध्ये भारतात आणि महाराष्ट्रातसुद्धा पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाली होती त्यावेळेला पोल्ट्री व्यवसायिकांना एका पक्षाच्या मागे वीस रुपये या दराने मदत देण्यात आली होती. अशीच मदत आतासुद्धा देण्यात यावी ही मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आलेली आहे. पण याबाबत केंद्राचे उपाययोजना आणि मदतीचे धोरण लक्षात घेऊन पावले उचलू असे केदार म्हणाले. केदार म्हणाले की, एकूणच क्षेत्राला मदत द्यावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये असे ठरवण्यात आले की पवारांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यात केंद्रात संबंधित मंत्र्यांची भेट घेईल असे लोकसत्ताच्या वृत्तात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!