Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खबरदार !! कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे जाहीर कराल तर … होऊ शकतो गुन्हा दाखल !! देशात ७३ जणांना लागण

Spread the love

देशात सर्वत्र करोना व्हायरसविषयी भीती व्यक्त केली जात असतानाच काही लोक सोशल मीडियावर अफवा पसरवण्याबरोबरच कोरोना विषाणूची  बाधा  झालेल्या रुग्णांची नावे आणि फोटो उघड करीत असल्याने या रुग्णांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. सामाजिक माध्यमातून (सोशल मीडिया) अशा प्रकारची माहिती उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिला आहे.

भारतात ‘करोना’बाधित रुग्ण आढळून आल्यापासून अफवांचं पेव फुटलं आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनावश्यक माहिती शेअर केली जात आहे. त्यात आता करोनाबाधित रुग्णांची नावे शेअर करणाऱ्यांची भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे. ‘अशा परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. आपत्तीच्याप्रसंगी प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. नावे उघड झाल्यास विनाकारण त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ शकतो. तेव्हा नागरिकांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कोणीही नावे उघड करता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले. ‘कुणाचीही नावे किंवा चुकीच्या गोष्टी शेअर केल्या जाऊ नयेत असं आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत आहोत. परंतु सोशल मीडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने पोलीस विभागाचा सायबर सेल लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवित असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असं म्हैसकर म्हणाले.

देशातील १२ राज्यात आढळले कोरोनाचे रुग्ण 

सध्या देशातील १२ राज्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले असून यामध्ये एकट्या महाराष्ट्रात ११ करोनाबाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. भारतात आत्तापर्यंत एकूण ७३ जणांना करोनाची लागण झाल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आकडेवारीत स्पष्ट करण्यात आलाय. यामध्ये १७ परदेशी रुग्णांचाही समावेश आहे. चीनच्या वुहानमधून जगभर फैलावलेल्या या रोगाला जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) महारोग म्हणून घोषित केलं आहे. देशात सर्वाधिक करोनाबाधित केरळ राज्यात आढळले आहेत. या राज्यात १७ जणांना करोनाची लागणं झाली असून त्या खालोखाल  महाराष्ट्रात ११, उत्तर प्रदेशात १० तर दिल्लीत ६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

मंगळवारी जे सहा नवीन करोनाबाधित सापडले आहेत त्यापैंकी तीन जणांनी दुबईमार्गानं अमेरिकेचा प्रवास केला होता. दोन जणांनी दुबईचा तर एकानं लंडनहून अमेरिकेचा प्रवास केला होता. यातील चार जण बंगळुरू तर दोन जण पुण्याचे आहेत. भारतात या लोकांच्या संपर्कात आलेले तब्बल १४०० हून अधिक जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. दुसरीकडे, भूटानमध्ये एका करोनाबाधित अमेरिकन नागरिकाच्या संपर्कात आलेल्या ४०४ भारतीयांना आसाममध्ये वेगवेगळं करण्यात आलंय तसंच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येतंय. बुधवारी इटलीहून आलेल्या ८३ जणांना मानेसरमध्ये भारतीय लष्कराकडून बनवण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलंय. यामध्ये एका मुलाचा आणि मूळ भारतीय परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!