Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus : पुण्यापाठोपाठ मुंबईत दोन तर नागपुरात आढळला पहिला रुग्ण , आरोग्यमंत्र्यांनी घेतला राज्याचा आढावा

Spread the love

पुण्यापाठोपाठ मुंबईतही दोन जणांना तर नागपुरात एका रुग्णाला करोनाची लागण झाली आहे. मुंबईतील  दोन्ही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. दुबईहून आलेल्या पुण्यातील दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर त्यांच्यासोबत दुबईला गेलेल्या ४० सहप्रवाशांचा शोध घेण्यात येत होता. यापैकी काही लोकांचा तपास लागल्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे आज तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांनाही करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे, तशी माहिती राज्य आरोग्य नियंत्रण विभागाने आज दिली. त्यामुळे नागपुरातील एका रुग्णामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली असून यापैकी पाच जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. तसेच या दोघांपैकी एक रुग्ण भिवंडीतील असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नागपुरात आढळला पहिला रुग्ण 

राज्याची आर्थिक राजधानी मुंबईनंतर आता देशाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. नागपूरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात या रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा रुग्ण तीन दिवसांपूर्वी अमेरिकेहून नागपुरात आला होता. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता अहवालात कोरोना व्हायरस झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे राज्यात आता कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे.

दरम्यान राज्यात कोणतेही मोठे समारंभ न घेण्याचा निर्णय आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला असून सर्वच राजकीय पक्षांनाही मोठ्या समारंभांचं आयोजन न करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. तसेच आयपीएलचं आयोजन रद्द करायचं की नाही, याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आयपीएलचे सामने बघण्यासाठी एकावेळी ८० ते ९० हजार लोकं एकत्र जमतात. करोनाच्या वातावरणात अशा क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्याची सरकारची इच्छा नाही. या विषयावर आज कॅबिनेटमध्ये प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. त्यात दोन पर्यायांवर चर्चा करण्यात आली. आयपीएलचे सामने व्हावेत, पण तिकिट विक्री करण्यात येऊ नये. तिकिट विक्रीशिवाय सामने भरवण्यात यावेत. लोकांनी घरीच बसून थेट प्रक्षेपण पाहावं हा एक पर्याय समोर आहे. आयपीएलचे सामने पुढे ढकलण्याचा दुसराही पर्याय आहे. त्यावरही विचार झाला. कारण रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणं खेळाडूंनाही प्रोत्साहन देणारं ठरणार नाही. त्यामुळे या दोन्ही पर्यायांवर चर्चा झाली असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं टोपे म्हणाले.

दरम्यान, पुणे येथे उपचार सुरु असलेल्या २ करोनाबाधित प्रवाशांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांसोबतचे मुंबईतील २ सहप्रवासी देखील आज कोरोना बाधित असल्याचा निर्वाळा कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ७ झाली आहे. सध्या पुणे येथे १८ जण तर मुंबईत १५ जण भरती आहेत. या शिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वाय सी एम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत, टोपे यांनी दिली.

दरम्यान आज सकाळी आरोग्य मंत्र्यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधासंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमण्यात येणार असून त्यामध्ये आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, नगरविकास, महसूल, ग्रामविकास, गृह विभाग यांचे सचिव असतील, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पुणे येथे कार्यान्वीत असलेला नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जाणीवजागृती अधिक व्यापक करावी, अशा सूचना देतानाच यासाठी सर्व माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास, आयुक्त अनुपकुमार यादव, माहिती व जनसंपर्क संचालक अजय अंबेकर, आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे, डॉ.अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!