Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus : राज्यातील विमानतळांवर कसून तपासणी, पुण्यातील आय टी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिले ” हे ” आदेश !!

Spread the love

महाराष्ट्रात पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळल्याने पुणेकरांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सूचना केली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक हजेरीही बंद करण्यात आली आहे. पुण्यात करोनाचे एकूण ५ रुग्ण आढळले असून इतर  १२ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे पुण्यातील आयटी सेक्टरमध्ये खळबळ उडाली आहे. आयटी कंपन्यांसह अनेक खासगी कंपन्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची सवलत दिली आहे. ऑफिसला येऊ नका. घरूनच काम करा. सर्दी, खोकला आणि ताप आला तर कामावर येऊ नका, असे आदेशच या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच बायोमॅट्रीक मशीनला हात लावल्यानेही करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने बायोमॅट्रीक हजेरीही बंद करण्यात आली आहे.

दरम्यान आतापर्यंत  मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १,२९,४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या ३ विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण , इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत करोना  बाधित भागातून राज्यात एकुण ५९१ प्रवासी आले आहेत.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत.

दरम्यान  करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. तर मोठया प्रमाणावर करोना बाधित असणाऱ्या १२ देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यातूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ आणि टोल फ्री क्रमांक १०४वर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!