Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Effect : औरंगाबादेत शिवजयंतीची मिरवणूक नाही , महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

Spread the love

राज्यावर आलेले करोनाचे संकट लक्षात घेता औरंगाबाद शहरातील शिवजयंतीची मिरवणूक शिवसेनेने रद्द केली असल्याची  माहिती शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मिरवणुकीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्याचे कार्यक्रम शहरातील विविध भागात आयोजित केले जातील, असे ते म्हणाले. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर बंगल्यात खैरे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, करोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी उद्या गुरुवारी शिवजयंतीच्या निमित्तानं मिरवणूक न काढण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी नऊ वाजता क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून, अभिवादन केले जाईल अशी माहिती खैरे यांनी दिली. त्यानंतर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यासाठी रवाना होणार आहेत. शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केल्यावर संस्थान गणपती मंदिराजवळ सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येणार आहे. या ठिकाणी गणपतीची आरती केली जाईल, असे खैरे म्हणाले. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असा उल्लेख त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात शिवप्रतिमेचे पूजन करुन शिवजंयती साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेला महापौर नंदकुमार घोडेले, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, मच्छींद्र सोनवणे आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी (१५ मार्च) श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता हा मेळावा देखील पुढे ढकलण्यात आला आहे, असे खैरे यांनी सांगितले.

महापालिकेच्या निवडणूक पुढे ढकलण्याची महापौरांची  मागणी 

दरम्यान महाराष्ट्रातही करोना व्हायरसचा शिरकाव झाल्याने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. महापौर नंदकुमार घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. करोना व्हायरसची भीती लक्षात घेता महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी. ही निवडणूक पुढे ढकलताना पालिकेवर प्रशासक नेमू नये. विद्यमान नगरसेवकांनाच सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडले यांनी केली आहे.

औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक औरंगाबादमध्ये येत असतात. जगभरातील पन्नासहून अधिक देशातील नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. औरंगाबादमध्ये या देशातूनही पर्यटक येण्याची शक्यता आहे. तसेच नाशिक आणि पुणे येथे करोना व्हायरसचे रुग्ण सापडले आहेत आणि या दोन्ही शहरापासून औरंगाबाद जवळ आहे.  महापालिका करोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. मात्र करोनामुळे भीतीचं वातावरण असल्याने एप्रिल महिन्यात होणारी पालिकेची निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी घोडले यांनी केली आहे. घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निवडणूक आयोगाकडेही ही मागणी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी करोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता अधिक असते. पालिका निवडणूक प्रचाराच्यावेळी, सभा आणि रॅलीदरम्यान गर्दी होण्याची शक्यता असल्याने करोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेही सहा महिने पालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!