Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus Effect : मलेशियातून घरी परतणाऱ्या कुटुंबाला सोसायटीत येण्यास मज्जाव तर कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबियांवर बहिष्कार !!

Spread the love

महाराष्ट्रात कोरोनाचे  पाच रुग्ण आढळल्यानंतर एकाच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक वेगळा प्रकार समोर आला आहे. सहलीसाठी मलेशियाला गेलेल्या येथील एका कुटुंबालाच सोसायटीत प्रवेश न करू देण्याचा सोसायटीधारकांनी निर्णय घेतला आहे. करोनाच्या धास्तीनेच सोसायटीधारकांनी असा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान पुण्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या पाच रूग्णांपैकी एका रूग्णाच्या सोलापूर जिल्ह्यातील घरावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या सोलापूरमधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ‘आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा’, असे म्हणत त्या व्यक्तीच्या घरावर गावकर्‍यांनी बहिष्कार टाकला आहे. लोकसत्ता ऑनलाईनने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

सोशल मीडियावरून करोना व्हायरसच्या बाबतीत अनेक अफवा पसरविण्यात येत असल्याने यामुळे अनेकजण जास्तच धास्तावले आहेत. मलेशियाला सहलीसाठी गेलेले पिंपरी-चिंचवड शहरातील एक उच्च शिक्षित कुटुंब आता घरी परतत आहे. परंतु, कालच पुण्यात दुबईहून आलेल्या पती पत्नीला करोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने, सोसायटीधारकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. मलेशियाहून येणाऱ्या या कुटुंबाला सोसायटीत येऊ देऊ नये, यासाठी  सोसायटीधारकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकारामुळे पोलीस देखील हतबल झाले आहेत. कारण, एखाद्या कुटुंबाला पोलीस प्रशासन देखील त्यांच्याच घरात येण्यास रोखू शकत नाही. त्यामुळे धास्तावलेले सोसायटीधारक आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, संबंधित कुटुंब हे मलेशियाहून मायदेशी परतल्यानंतर विमानतळावर त्यांची वैद्यकीय तपासणी होणारच आहे. त्यानंतर त्यांना राहात असलेल्या ठिकाणी सोडलं जाईल. परंतु, त्या अगोदरच सोसायटीधारकांचा संयमाचा बांध सुटला आहे. ते अत्यंत भीतीच्या सावटाखाली असून चिंतेच्या वातावरणात असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

सोलापुरात बहिष्कार 

याशिवाय पुण्यात ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे त्या वक्तीच्या सोलापुरातील एका गावात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना सतत गाव सोडून जाण्यासाठी तगादा लावला जात आहे. ‘आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा,’ असा मानसिक त्रास दिला जात असल्याचे करोना बाधित रुग्णाच्या भावाने सांगितले. या संपूर्ण प्रकरणाविरोधात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. लोकसत्ता ऑनलाईनशी  बोलताना कोरोना बाधित रुग्णाचा भाऊ म्हणाला की, ‘करोना व्हायरस या आजाराचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक माझा भाऊ आहे. माझ्या भावाला आजार झाल्याचे समजताच घरी  जाऊन आम्ही सर्वांना धीर दिला. काही क्षणांतच प्रसारमाध्यमांत माझ्या भावाच्या नावासह बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर काही तासांत गावाकरी आमच्या घरी आले, विचारपूस करू लागले. तर काहींनी तुम्ही गावामध्ये राहू नका, तुमच्यामुळे आम्हाला हा आजार होईल, असे सांगितले.’

एका बाजूला भाऊ आजारी, तर दुसर्‍या बाजूला गावाकऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रास, यांमुळे अडचणी वाढल्या आहेत. कठीण परिस्थितीमध्ये गावानं-गावकऱ्यांनी पाठीशी उभे राहणं गरजेचं होतं. मात्र, झालं वेगळंच. त्यांनी आमच्या घरावरच बहिष्कार टाकला. त्यामुळे घरातील सगळेच चिंतेत आहेत. आता यावर सरकारनंच निर्णय घ्यावा. आम्हाला या संकटातून बाहेर काढावं, अशी मागणी करोनाग्रस्त रुग्णाच्या भावानं केली आहे. त्यानं या संपूर्ण प्रकरणासंबंधी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर आता काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!