देशातील कोरोना बाधितांची संख्या ६० वर , राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू , जाणून घ्या कॉल सेंटरचे क्रमांक…

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतात  कोरोनाव्हायरसचा धोका आता अधिकच वाढला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल ६० वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६० झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. दरम्यान एएफपी ने दिलेल्या वृत्तानुसार इराणमध्ये कोरोनामुळे ६३ नवीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने या देशात आतापर्यंत एकूण ३५४ मृत्यू झाले आहेत.

Advertisements

देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्रमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे एकूण ५ रुग्ण आहेत. पुण्यात हे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे प्रशासन आता सतर्क झालं आहे. पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा  लागू करण्यात आला आहे, तर तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात हा व्हायरस अधिक पसरू नये, राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्यात.

Advertisements
Advertisements

पुण्यात कोरोना बाधित 5 रुग्ण आढळून आल्याने भीती व्यक्त केली जात आहे. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनापासून खबरदारी म्हणून पुण्यातील तीन शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कात्रज, धायरी, नांदेड सिटीमधील तीन शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांसाठी 104 टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. पुणेकरांना  कोरोना संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 यावर संपर्क साधावा.

राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आहे. अशा परिस्थितीत काळाबाजार करणाऱ्या किंवा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्याकडील माल जप्त केला जाईल. नागरिकांनी अशा व्यापाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. अहमदनगरमध्येही करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कची मागणी वाढली आहे. विक्रेत्यांकडे मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. एन ९५ मास्क उपलब्ध होत नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणू संदर्भात विविध अफवा पसरवण्यात येत आहेत. मात्र, आता करोनाबाबत अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल होणार आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत, अशी माहिती नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड-19  चे आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. त्यापैकी ८ केरळमधील आहेत, तर राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ६० झाला आहे.

 

आपलं सरकार