Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Corona Virus : पुण्यात प्रशासनाचा अलर्ट , दुबईहून परतलेल्या “त्या” ४० जणांचा शोध जारी, सर्व यंत्रणा सज्ज

Spread the love

पुण्यात ‘कोरोना’चे दोन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पुणे महापालिकेने युद्ध स्तरावर कामाला सुरुवात केलीय. कोरोनाच्या रुग्णांसाठी वेगळ्या हॉस्पिटलची आणि आयसोलेशन वॉर्डसची गरज असल्याने अवघ्या काही तासांमध्ये पालिकेने २०० खाटांची व्यवस्था केली असून लवकरच हे तात्पुरतं हॉस्पिटल सुरु होणार आहे. राजयोग सोसायटी आणि सणस मैदानातील इमारतीत हे तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या २ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी डॉक्टरांचे पथक आणि इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची महिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात आढळून आलेल्या दोन्ही करोनाच्या रुग्णांपैकी एका रुग्णामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली असून दुसऱ्या रुग्णामध्ये करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तसेच या दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. डॉ. दीपक म्हैसकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दुबईहून आलेल्या या दोन्ही रुग्णांची नायडू रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तसेच या दोन्ही रुग्णांनी यापूर्वीच्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी प्रवास केला त्याची माहिती घेण्यात आली आहे. या दोघेजण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुबईत ४० जणांच्या ग्रुप सोबत फिरायला गेले होते. १ मार्च रोजी ते भारतात परत आले. या दोघांपैकी एकाला त्रास झाल्यामुळे त्यांनी ८ मार्च रोजी डॉक्टरकडून आपली तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले. दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण १ मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नव्हते, असं म्हैसकर यांनी सांगितलं.

भारतात परत आल्यानंतर हे दोघे ज्यांच्या संपर्कात आले त्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रूग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यत रुग्णांच्या कुटुंबातील ३ व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. वरील दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या एकूण ४० व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे विविध जिल्ह्यातील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे. वरील दोन्ही व्यक्तींनी ज्या व्यक्तीच्या ओला टॅक्सीने मुंबईवरून पुण्याला प्रवास केला, अशा व्यक्तीची माहिती घेण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना देखील काल रात्री दवाखान्यांमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर पथकाद्वारे वरील दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण २१ ठिकाणी २०७ बेड, अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्षासहित तयार करण्यात आले आहेत. जिल्हयातील सर्व डॉक्टरांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांचेकडे आलेल्या रूग्णांची तपासणी करत असतांना परदेशातून भारतात आलेल्या रूग्णांची माहिती वेगळयाने ठेवावी, असं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशननेही केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!