Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही, तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने २५८ जणांना घरी सोडले : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Spread the love

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९०४ विमानांमधील १ लाख ९ हजार ११८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५६० प्रवासी आले असून ३०५ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.


दिनांक १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २७३ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २५८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर १५ जणांचे अहवाल उद्या प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या २७३ प्रवाशांपैकी २५८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १३ जण मुंबईत तर २ पुणे येथे भरती आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुढील सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे –
o वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
o इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते.
o बाधित भागातून येणा-या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.
o या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते.
o याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे.
o या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

संशयित कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू 

दरम्यान पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये कोरोनाच्या संशयावरून  वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या एका मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण नुकताच सौदी अरेबियाचा दौरा करून भारतात परतला होता. भारतात येण्याच्या आदल्या दिवशीच या रुग्णामध्ये करोना व्हायरसची लक्षणं आढळली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाला ताप आणि सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू होता. मात्र  अद्याप या रुग्णाचा ‘करोना चाचणी’चा रिपोर्ट हाती आलेला नाही. दुसरीकडे, देशभर करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार अलर्टवर आहेत. आरोग्य सेवा संचालक अजय चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव जॅनरुल हक असं आहे.  नुकतेच ते सौदीवरून भारतात परतले होते आणि तीन-चार दिवसांपासून त्यांच्याकडे इन्सुलिनदेखील नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू मधुमेहामुळे झाल्याचं नाकारता येत नाही.

चक्रवर्ती यांनी पुढे म्हटले आहे कि , आम्ही हक यांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची वाट पाहत आहोत. कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यताही  तशी कमी आहे . दरम्यान वैद्यकीय चाचणी अहवाल येण्यापूर्वीच हक यांचा अंत्यविधी पार पडणार आहे. त्यामुळे करोनाबाधित मृतांच्या अंत्यविधीवेळी घेतली जाणारी काळजी हक यांच्यावेळीही घेतली जाणार आहे.  हक यांच्या कुटुंबीयांनादेखील मृतदेहाला हात लावण्याची परवानगी नसेल. हक यांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीला प्रोटेक्टिव्ह गिअर, मास्क आणि ग्लोव्ह्ज घालावे लागतील. टेस्ट रिपोर्ट आला नसला तरी कोणताही धोका टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!