Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : मराठी भाषेला अधिक समृद्ध करा : गणेश रामदासी, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

Spread the love

औरंगाबाद :  संतांची भूमी असलेल्या मराठवाड्याला थोर अशी संत परंपरा लाभलेली आहे. संतांच्या ओव्या, अभंग, ग्रंथांच्या माध्यमातून मराठी अजरामर झाली. या मराठीची समृद्धी वाढविण्यासाठी मराठीचे संस्कार, संस्कृती जतन करण्यासाठी मराठी भाषेचा प्रत्येकाने आग्रह धरून मराठीचा वापर वाढविला पाहिजे. या आग्रहाची सुरूवात स्वत:पासून करावी, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मराठवाडा विभागाचे संचालक गणेश रामदासी यांनी केले.
शासकीय विभागीय ग्रंथालयामध्ये शासकीय विभागीय ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. रामदासी बोलत होते. या कार्यक्रमास मनपा उपायुक्त कमलाकर फड, मानव विकास मिशनचे उपायुक्त धूपचंद राठोड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सहायक संचालक सुनील हुसे, विभागीय ग्रंथपाल सुभाष मुंढे, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब वैद्य आदी उपस्थित होते.
श्री. रामदासी म्हणाले, पूर्वी संत परंपरेतून आलेल्या ओव्या, अभंग ऐकायला मिळत. आता तशी परिस्थिती क्वचित पहावयास मिळते. आपली मराठी श्रेष्ठ, समृद्ध अशी भाषा आहे. दासबोधांपासून मुकुंदराजांपर्यंत, संत तुकारामांपासून चक्रधरांपर्यंतच्या साहित्यात शब्दांची वैविध्यता, भाषेचे लालित्य समजण्यास मदत होते. पंजाबमध्ये संत नामदेवाच्या अभंग, ओव्यांना सहज स्वीकारले. इंग्रजीनेही मराठीतून अनेक शब्द घेतलेले आहेत. तसेच मराठीनेही अन्य भाषेतील शब्द संपदेबाबत सर्व समावेशक पद्धतीने विचार करून अधिक समृद्ध होणे आवश्यक असल्याचे मत श्री. रामदासी यांनी मांडले.
मराठी भाषेला उत्तम व्यासपीठ दिल्लीमध्ये आहे. तेथील महाराष्ट्र परिचय केंद्र मोठ्याप्रमाणात मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्य करत असते. त्यांच्या ग्रंथालयातून मराठीला अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. विविध उपक्रम राबविण्यात येतात. संघ लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांच्या व्यक्तीमत्तव चाचण्यांची तयारीही महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत करण्यात येते. त्याच धर्तीवर जिल्हा माहिती कार्यालय, माहिती केंद्र आणि ग्रंथालय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विविध नवोपक्रम राबविण्यात यावे. जिल्ह्यातील विविध ग्रंथालयात मिळणारी ग्रंथांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल, या दृष्टीने विचार व्हावा, अशी अपेक्षा श्री.रामदासी यांनी ग्रंथालयाकडून व्यक्त केली.
श्री. राठोड यांनी मराठी भाषेचा गौरव करताना दैनंदिन वापरात प्रत्येकाने कटाक्षाने मराठीचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे मत मांडले. श्री.फड यांनी साहित्य वाचनाचे महत्त्व विषद केले. त्याचबरोबर आगामी काळात मराठी अधिकाधिक समृद्ध होईल, असेही सांगितले. सहायक संचालक सुनील हुसे यांनी साहित्य वाचनाचे महत्त्व सांगितले. मराठी भाषा दैनंदिन जीवनात अंगीकारून कृतीशील बनावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्री. वैद्य यांनी केला. त्यांनी मराठी भाषेचा गौरव केला. तसेच या भाषेतील चांगले स्वीकारून तिला अधिक सर्वगुण संपन्न बनविण्यासाठी मराठी भाषेचा आग्रह प्रत्येकाने धरावा, असे सांगितले. सुरूवातीला फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांना ग्रंथ, पुष्प भेट देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक श्री.मुंढे यांनी केले. त्यांनीच उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा दिली व आभार मानले. सूत्रसंचालन मयूर तावडे यांनी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!