Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपल्या ३६ तासांच्या भारत दौऱ्यांनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत काय बोलले डोनाल्ड ट्रम्प ?

Spread the love

आपल्या ३६ तासांच्या भारत दौऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  दौरा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देशातील सर्वच मुद्यांवर सावध भाष्य करीत भारत याआधी जितका मला आवडत होता त्यापेक्षा जास्त आता आवडल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या सविस्तर चर्चेबद्दल माहिती दिली. यामध्ये दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारा बरोबरच सीएए , एनआरसी , काश्मीर प्रश्नावरही ट्रम्प यांनी आपले मत व्यक्त केले. या विषयांवरील मोदींच्या भूमिकेबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, मोदींसोबत धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा केली. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य हवं असल्याचंही मोदींनी सांगितलं असून मोदी त्यावर खूप काम करत आहेत. एकूण पंतप्रधान मोदींसोबत अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

दरम्यान दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले कि , काही हल्ल्यांबाबत मी ऐकलं पण त्यावर कोणती चर्चा झाली नाही. मोदींशी सीएए वर चर्चा झाली पण  सीएए हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले असतानाच गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सीएए विरोधात चालू असलेल्या आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला असून त्यात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असल्याची अधिकृत माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

बहुचर्चित काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली. ते म्हणाले की, काश्मीर प्रकरणात दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यात मला आनंद होईल. पंतप्रधान मोदी आणि इमरान खान यांच्याशी माझी चांगली मैत्री आहे असंही ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान ट्रम्प यांनी  काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीवरून युटर्नही घेतला. ते म्हणाले की, मी मध्यस्थीबाबत बोललो नव्हतो. काश्मीर हा भारत-पाक यांच्यातील मोठा प्रश्न आहे. दोन्ही देश यावर काम करत आहेत. बऱ्याच काळापासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि , इस्लामिक दहशतवादाला रोखण्यासाठी आम्ही काम करत आहे. बगदादीला आम्ही ठार केलं. इराण आणि सिरियाने मिळून आयएसआयएस वर कारवाई करायला हवी असंही ट्रम्प म्हणाले. तालिबान आणि अमेरिका यांच्यातील शांतता करारावर ट्रम्प म्हणाले की, मी मोदींसोबत यावरसुद्धा चर्चा केली. भारताला सुद्धा हा करार व्हावा असं वाटतं. जवळपास हे नक्की आहे त्यामुळे सर्वजण आनंदी आहेत. भारत दौरा खूप चांगला झाला असं ट्रम्प म्हणाले. भारतासोबत ३ अब्ज  डॉलर्सचा करार झाला. पंतप्रधान मोदींशी चांगली मैत्री आहे. दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत करायचे आहेत आणि भारत एक चांगली बाजारपेठ असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं. शेवटी त्यांनी सांगितलं कि , लोकशाहीवर विश्वास ठेवणं ही गौरवाची गोष्ट आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!