Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कारवाई : सैन्य दलाच्या जवानांशी दुर्व्यव्हार करणाऱ्या अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन , आदित्य ठाकरे यांचा निर्णय

Spread the love

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बॅंड पथकातील जवानांसमवेत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांची मूळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधीतावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते.

महाराष्ट्र सदन येथे आज सकाळी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सैन्य दलाच्या गोरखा रेजीमेंटचे बँड पथक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पथकातील जवान सदनच्या उपहारगृहातील एक्झीक्युटीव्ह डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी सदनचे सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना तिथे बसण्यास विरोध केला. जवानांना बाहेरच्या सार्वजनिक डायनिंग हॉलमध्ये बसण्यास सांगितले आणि त्यांच्याशी हुज्जत घातली. यावर कार्यक्रम आयोजकांनी आक्षेप घेतला व ते जवानांसह सदनाबाहेर पडले. जवानांसोबत झालेल्या या दुर्व्यवहाराच्या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री श्री.ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा करुन माहिती घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधीत सहायक निवासी आयुक्तावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.

त्यानुसार महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे. तसेच जवानांशी केलेल्या दुर्व्यवहारप्रकरणी कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन चौकशी करण्यासंदर्भात त्यांची मूळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आले आहे. कायरकर हे महाराष्ट्र सदनला प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!