Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांची अखेर माफी , “या” पत्राद्वारे व्यक्त केल्या भावना

Spread the love

आपल्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्यावरून चर्चेत आलेल्या हभप निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांनी  अखेर पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या खास वक्तृत्व शैलीतून श्रोत्यांना मनमुराद हसविणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख हे आपल्या एका कीर्तनातील वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत.  यानंतर त्यांच्या बाजूने आणि विरोधात अनेकांनी मत व्यक्त केली होती. मात्र इंदोरीकरांनी माफी मागत भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एक पत्र जारी केले आहे.


या पात्रात इंदोरीकर महाराजांनी आपल्या पत्रात, महिलावर्गाची माफी मागितली आहे. तसेच २६ वर्षांपासून मी किर्तनरुपी समाजप्रबोधन करत आहे. त्यामुळं माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचंही इंदोरीकर महाराजांचे म्हणणे आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महारांजवर टीका केली होती. त्यानंतर अनिस संस्थेने इंदोरीकर महाराजांना माफी मागण्यास सांगितले होते. त्यानंतर अखेर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात  कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी केलेलं वक्तव्य पीसीपीएनडीटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडीटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली होती. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात येणार होता.

काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज ?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’ त्याच्या कीर्तनातील या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे , बाळासाहेब थोरात , डॉ. सदानंद मोरे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान आपल्या समर्थकांनाही त्यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!