Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

इंदोरीकर महाराजांवर तुकारामाचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांचीही टीका

Spread the love

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वक्तवयवरून निर्माण झालेला वाद काही केल्या थांबायला तयार नाही . या विषयावर आता संत तुकाराम महाराजांचे वंशज व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि ,  ‘महाराष्ट्राला कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा आहे. त्यात इंदुरीकरांचं कीर्तन बसत नाही. त्यांचे विनोदही कमी दर्जाचे असतात. खरं तर त्यांच्या कीर्तनावर यापूर्वीच चर्चा व्हायला हवी होती.’

डॉ . सदानंद मोरे म्हणाले कि , ‘मी गेले ५०-५५ वर्षे कीर्तन ऐकतो आहे. मामासाहेब दांडेकर व त्यांच्याही आधीच्या कीर्तनकारांची कीर्तनं मी ऐकली आहेत. पण अशा प्रकारचे विनोद पूर्वी कोणाच्याही कीर्तनात नव्हते. ही लाट अलीकडेच आली आहे. हल्ली लोकप्रिय कीर्तनकारांच्या नावामागे विनोदमूर्ती किंवा विनोदाचार्य असं लिहितात. विनोदाचार्य हे काही कीर्तनकाराचं विशेषण नाही,’ असं मोरे म्हणाले. ‘इंदुरीकरांचे विनोद कीर्तनामध्ये तर शोभत नाहीतच, पण एकूण विनोद म्हणूनही ते कमी दर्जाचे आहेत. त्यात बहुतेक वेळा स्त्रियांना टार्गेट केलं जातं. स्त्रियांवर होणारे हे विनोद व त्याला मिळणारी दाद हे आपली अभिरूची घसरल्याचे लक्षण आहे. इंदुरीकरांचं कीर्तन ऐकताना आपण संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकोबा यांचा विचारही करू शकत नाही,’ असंही त्यांनी सुनावलं आहे.

दरम्यान ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून महाराष्ट्रात वादाचं मोहोळ उठलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह काही महिला संघटनांनी इंदुरीकरांविरुद्ध पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्यावर टीकाही होत आहे. दुसरीकडं काही संघटना त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सदानंद मोरे यांनी आपलं मत मांडलं आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!