गंगाखेड फसवणूक प्रकरण : रत्नाकर गुट्टे यांच्यासह साखर कारखान्याचे एमडी आणि बँकेच्या व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

गंगाखेडचे आमदार रत्नाकर माणिकराव गुट्टे यांच्यासह कारखान्याचा कार्यकारी संचालक आणि बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखेच्या तत्कालीन व्यवस्थापकाविरुद्ध  कागदपत्रांचा गैरवापर करून तब्बल २५ लाख ६० हजारांचे कर्ज उचलल्याच्या आरोपावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लिमिटेड कारखान्यासोबत ऊसतोड मजूर पुरवठा व ऊस वाहतुकीचा करार करण्यासाठी दोघा मुकादमांनी स्वतःची महत्वाची कागदपत्रे कारखान्याच्या हवाली केली होती. परंतू, या दोघांनाही अंधारात ठेवत त्यांच्या गैरवापर करण्यात आला, असा त्यांच्यावर आरोप आहे.

Advertisements

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे कि, फसवणुकीच्या या प्रकाराला २०१५ साली सुरुवात झाली. अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील रावण पांडुरंग केंद्रे आणि प्रभाकर गुलाब केंद्रे या दोन ऊसतोड मुकादमांनी २०१५-१६ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोड मजूर पुरवठा व ऊस वाहतुकीचा करार करण्यासाठी गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लिमिटेड कारखान्यासोबत संपर्क केला होता. कारखान्याने मागणी केल्यानुसार बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखेतील खात्याच्या कोऱ्या धनादेशांसह अन्य महत्वाची कागदपत्रं त्यांनी कारखान्याच्या परळी येथील कार्यालयात जमा केली होती. परंतु, या कालावधीत चांगला मोबदला मिळत असल्याने या दोन्ही मुकादमांनी कर्नाटक येथील सदाशिव कारखान्यासोबत करार केला. त्यामुळे गंगाखेडच्या कारखान्यासोबत त्यांचा कसलाही करार झाला नाही आणि त्यांनी कारखान्याला मजूर किंवा वाहन पुरवठा देखील केला नाही. तरीसुद्धा या दोघांनी वारंवार मागूनही कारखान्याने त्यांची कागदपत्रे परत केली नाहीत. त्यानंतर कर्नाटक येथील कारखान्याच्या व्यापात गुंतल्यामुळे ते दोघेही पाठपुराव्यात कमी पडले आणि त्यांची कागदपत्रे गंगाखेड साखर कारखान्याकडेच राहिली.

Advertisements
Advertisements

दरम्यानच्या काळात २०१५ साली जुलै महिन्यात आमदार रत्नाकर गुट्टे, कारखान्याचा कार्यकारी संचालक यांनी बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखेच्या तत्कालीन व्यवस्थापकासोबत संगनमत करून दोघाही मुकादमांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत त्यावर आवश्यक तो मजकूर लिहून प्रत्येकी १२ लाख ८० हजार असे एकूण २५ लाख ६० हजारांचे कर्ज उचलले आणि त्या रकमेची विल्हेवाट लावली. हे कर्जखाते थकीत झाल्याने बँकेने २०१८ साली या मुकादमांना वाढीव व्याजासह १८ लाख १६ हजार ८२ रुपये वसुलीची नोटीस पाठवल्यानंतर त्यांना धक्काच बसला. या प्रकार समोर आल्यानंतर दोघांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत सविस्तर माहितीसह तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने त्यांची फिर्याद दाखल करून घेत आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तिन्ही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१८ मध्ये कर्जखाते थकीत गेल्याने मुकादमांना नोटीसा गेल्या आणि हा प्रकार उघडकीस आला. करारासाठी कारखान्याने दोन्ही मुकादामांचे कोरे धनादेश, कोरे बॉंड, ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या आरसी बुकच्या प्रती, इन्सुरन्सच्या प्रति, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुकची प्रत, स्वाक्षरी पडताळणी अर्ज, शेताच्या सात बारा आणि आठ ‘अ’च्या प्रती, फोटो यांसह काही कोरे अर्ज ठेऊन घेतले. त्यानंतर बँकेत दोन बनावट खाते उघडून त्यातून कर्जाची रक्कम उचलण्यात आली. बँकेकडूनही मुकादमांना या व्यवहाराबाबत कसलीही माहिती देण्यात आली नाही किंवा संपर्क साधला नाही, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आपलं सरकार