Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अस्थी विसर्जनावरून परतणाऱ्या वाहनाला भीषण अपघात, ८ ठार १६ जखमी , दोन किलोमीटरवर आले होते गाव ….

Spread the love

कळंब-जोडमोहा मार्गावर वाढोणा गावाजवळ आज, रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नातेवाइकाच्या अस्थिविसर्जनाहून घरी परतत असताना चारचाकी वाहनाला झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार  तर १६ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. गावात पोहोचण्यापूर्वी केवळ दोन किलोमीटर आधी हा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती कळताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेने जोडमोहा येथे शोककळा पसरली आहे.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , जोडमोहा येथील बाबाराव वानखेडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी जोडमोहा येथील त्यांचे नातेवाइक वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे टाटा मॅजिक या मालवाहू गाडीने  गेले होते. विधी आटोपून परत येत असताना, वाढोणा गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकले. त्यानंतर रस्त्यालगतच्या खोल भागात जाऊन कोसळले. या भीषण अपघातात महादेव बावनकर (वय ५३, रा. शेंदुरजनाघाट), किसन कळसकर (वय ५५), महादेव चंदनकर (वय ५८), वाहनचालक अमर आत्राम (वय ३२) तिघेही राहणार जोडमोहा आणि गणेश चिंचाळकर (वय ५२, रा. महागाव), अंजना वानखडे (वय ६०) सरस्वती दाभेकर (वय ६०) दोघीही राहणार जोडमोहा, संभाजी मेश्राम अशी मृतांची नावे आहेत. अपघातात इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासह १३ जण किरकोळ जखमींना यवतमाळात शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!