Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल विराजमान , “नही डर किसी का आज…” गाण्याच्या सादरीकरणाने केली कामाला सुरुवात…

Spread the love

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसचा दणदणीत पराभव केल्यानंतर आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर विराजमान झाला आहे. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची, तर  इतर सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनासह दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या डॉक्टर, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, कामगार, बस मार्शल अग्निशमन दलाचे जवान आदींना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यासाठी दोन हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.


केजरीवाल यांच्यासोबत मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मनिष सिसोदिया यांनी मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री काम पाहिले आहे. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. “दिल्लीतील नागरिकांनी एका नव्या राजकारणाला जन्म दिला आहे. हा माझा विजय नाही. प्रत्येक दिल्लीकराचा विजय आहे. मी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री आहे. निवडणुका झाल्या आहेत. जे आरोपप्रत्यारोप झाले ते विसरून पुन्हा एकत्र येऊन काम करू. दिल्लीतील प्रत्येक माणसाच्या घरात आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करेल,” असं केजरीवाल म्हणाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानात या शपथविधी सोहळ्यासाठी जमलेल्या जनतेलाही संबोधित केलं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. परंतु, दुसऱ्या कार्यक्रमात व्यग्र असल्यानं ते इथं उपस्थित होऊ शकले नाहीत. पण या मंचावरून मी पंतप्रधानांकडे आणि केंद्र सरकारकडे आशीर्वादाची याचना करतो, असं म्हणतानाच केंद्रासोबत मिळून दिल्लीच्या विकासासाठी काम करणार असल्याचं प्रतिपादन केलं .

ते पुढे म्हणाले कि , केजरीवाल सगळं काही मोफत देत आहेत, असं म्हणत काही लोक माझ्यावर टीका करत आहेत. पण, जगातील मौल्यवान गोष्टी मोफत मिळाव्यात याची सोय निसर्गानंच केलीय. मग ते आईचं प्रेम असो, वडिलांचे आशीर्वाद असो किंवा श्रावण कुमारचं समर्पण… केजरीवाल जनतेवर प्रेम करतो त्यामुळे त्याचं प्रेमही मोफत आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी जनतेची मनंही जिंकली. हा केवळ माझा विजय नाही तर हा प्रत्येक दिल्लीकराचा विजय आहे, दिल्लीतल्या प्रत्येक कुटुंबाचा विजय आहे. दिल्लीकरांच्या आयुष्यात आनंद आणि गोडवा आणण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्ष प्रयत्न केले, असंही त्यांनी म्हटलं. निवडणुकीत राजकारण अटळ आहे. आमच्या विरोधकांनी आमच्यावर जी काही टीका केली त्यासाठी आम्ही त्यांना माफ केलंय. मी कुणाचंही कोणतंही काम करताना भेदभाव केलेला नाही. माझ्या कुटुंबात सर्वांचा समावेश आहे. तुमचं कोणतंही काम असेल तरी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता मी सगळ्यांचं काम करेल, अशी ग्वाहीही अरविंद केजरीवाल यांनी यावेळी दिली. “हम होंगे कामयाब , नही डर किसीका आज…” हे गीतही केजरीवाल यांनी सादर करून उपस्थितांची माने जिंकली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!