Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंगणघाट शिक्षिका जळीत प्रकरण : पीडितेच्या मृत्यूची बातमी समजताच दारोडा गाव झाले सुन्न , गावात पेटली नाही एकही चूल…

Spread the love

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या  आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणाऱ्या  हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत असून तिच्या मूळ गावात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या गावात आज एकही घरात चूल पेटली नाही . समाजमन या घटनेमुळे सुन्न झाले आहे . या प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला आहे. घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. परिणामी दारोडा गावातील एका २४ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. काही वेळापूर्वी पीडितेचे पार्थिव  तिच्या दारोडा गावात दाखल झालं आहे. आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.

पीडितेच्या मृत्यूचे वृत्त समजताच दारोडा गावातील मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तोडफोडीच्याही घटना घडत असल्याचे दिसत आहे. संतप्त जमावावर नियंत्रण करणे पोलिसांना अवघड जात आहे. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला आहे. येथील नागरिक प्रचंड संतापले असून ते न्यायाची मागणी करीत आहेत. नराधमाला लवकरात लवकर फासावर लटकवा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या या घटनेचा लोकांमध्ये राग आहे. २४ वर्षाच्या या पीडित तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या नराधमाला तातडीने शिक्षा द्यावी, अशा घोषणा दिल्या जात आहे. गेल्या सात दिवसांपासून ही तरुणी मृत्यूशी लढत होती. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिचा लढा संपला. तिच्या कुटुंबीयांसाठी हे दु:ख पचवणं अवघड जात आहे. काही वेळापूर्वी हिंगणघाटमध्ये मृत पीडितांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन छेडलं होतं. लेखी स्वरुपात आश्वासन द्या, अशी मागणी सरकारकडे केली जात होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

हिंगणघाट येथे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. यानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नराधमाला तातडीने शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. आता काही वेळापूर्वीच पीडितेचे पार्थिक दारोडा गावात दाखल झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!