Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी वर्धा येथे संतप्त नागरिकांचा मोर्चा आणि बंद , आरोपीला फाशी देण्याची मागणी

Spread the love

वर्धा जिल्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा आक्रोश महाराष्ट्रभर वाढत असून आज या घटनेच्या निषेधार्थ वर्ध्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर फाशीवर चढवावे, अशी मागणी संतप्त मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये, तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत, तसेच स्त्रियांनीही भाग घेतला होता. या मोर्चात वर्ध्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी, शिक्षक तसेच शिक्षिकांनीही भाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मुख्य मार्गाने हा मोर्चा निर्मल बेकरी चौक ते अंबिका उपहारगृह असा गेला. पुढे इतवारा रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा येथेच समाप्त करण्यात आला.

हिंगणघाट येथील  नंदोरी चौकात दि. ३ फेब्रुवारी रोजी विकेश नगराळे याने महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. सध्या या तरुणीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले. महत्त्वाचे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य व्यक्तींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. या पीडित तरुणीवर नागपूर येथील ऑरेंज हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करत आहेत. पीडित तरुणीवर काल बुधवारी महत्त्वाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखीही तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पीडित तरुणीची प्रकृची स्थिर असून ती करण्यात येत असलेल्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे दिलासादायक वृत्तही डॉक्टरांनी दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!