Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंगणघाट शिक्षिका जळित प्रकरण : पीडितेचा श्वास पुन्हा सुरु करण्यात डॉक्टरांना यश, आरोपीच्या पत्नीने दिली हि प्रतिक्रिया…

Spread the love

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शिक्षिका जळीत प्रकरणातील पीडितेच्या जीवन मृत्यूची झुंज चालू असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पीडितेची श्वसनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होत आहे. तिच्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली असून  तिच्या चेहरा आणि डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेला आहे. तिची प्रकृती अद्याप चिंताजनक असून पुढील ४८ तास तिच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत आहे. दरम्यान कृत्रिम नलिका टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरू केला आहे. पण, अजून धोका टळलेला नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.


काय म्हणाली आरोपीची पत्नी ?

या  जळीत प्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , ‘ते असं काही करतील, असं वाटलं नव्हतं. त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता. घटना घडली त्या दिवसाच्या आदल्या रात्री ते प्रचंड अस्वस्थ होते. ते सारखे घराबाहेर जात होते. फोनवर कोणाशी तरी बोलत होते. सकाळी उठून ते कामाला जातील म्हणून मी त्यांच्यासाठी डबा करून दिला. मात्र, ते काहीही न सांगता घराबाहेर पडले आणि काही वेळातच या घटनेची माहिती मिळाली. मात्र, त्यांनी असं कृत्य करण्यापूर्वी माझ्या तान्ह्या मुलीचा विचार करायला हवा होता.’


खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांची संतप्त प्रतिक्रिया 

हिंगणघाट येथील शिक्षिका जळीत प्रकरणी तिव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘माणूसपणाला काळीमा फासणारी घटना. हे वाक्य फार हलकं वाटेल, अशी घटना सोमवारी हिंगणघाट येथे घडली. त्या नराधमाचा एन्काऊंटर करण्याची मागणी लोक करत असतील तर ते समजण्यासारखे आहे. आयुष्याची स्वप्न डोळ्यासमोर असणाऱ्या एका तरुण प्राध्यापिकेला भररस्त्यात जिवंत पेटवलं गेलं. हा क्रुरतेचा कळस झाला. हे जरा अतिच होत आहे. आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे, असे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी लिहिले आहे.

‘महाराष्ट्र कोणत्या दिशेला वाटचाल करत आहे? हाच का तो शिवरायांचा स्त्रीविषयक आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा महाराष्ट्र? हाच का तो शाहू फुले आंबेडकरांचा स्त्री पुरुष समानता ठेवणारा मानवतावादी, पुरोगामी महाराष्ट्र? हाच का तो परस्त्री सदा बहिणी- माया म्हणणारा साधू संतांचा महाराष्ट्र? आज जर महाराज असते, तर ह्या असल्या नराधमाला कोणती शिक्षा केली असती? हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांना ते समजून जाईल. महाराष्ट्र पोलिसांनी हैद्राबाद पोलिसांचा आदर्श घ्यावा, अशी जनभावना तयार झाली आहे सध्या. याशिवाय अश्या नरधमांच्यावर वचक बसणार नाही. आयुष्यात कुणा माता भगिनी कडे वाईट नजरेने बघण्याचं धाडसच काय, विचार सुद्धा मनात आला नाही पाहिजे. असं काही करण्याची गरज आहे. निर्भया असेल किंवा कोपर्डी च्या भगिनीला आज सुद्धा न्याय मिळलेला नाही. याची खंत आजही मनात आहे.’ असे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!