Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गळा आवळल्याने ” ती ” आपल्या हातून मेली असे समजून “तो ” पळत सुटला आणि रेल्वेखाली गेला…

Spread the love

सोबत असलेल्या महिलेचा तिच्याच ओढणीने गळा  आवळून खून करण्याचा प्रयत्न करून पळ काढणाऱ्या  धुळ्यातील एका ३७ वर्षीय व्यक्तीचा माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. सदर महिला त्याची प्रेयसी होती असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात मुंबई सेंट्रल जीआरपीमध्ये अपघाती मृत्यूची नोंद झाली असली तरी, पोलीस या प्रकरणात अधिक तपास  करीत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , “धुळयाला जाणाऱ्या ट्रेनमध्ये तुला बसवून देतो ” असे सांगत  या महिलेला सोबत घेऊन त्याने  वांद्रयाहून  ट्रेन पकडली आणि ते माटुंगा येथे उतरले. दादर टर्मिन्सहून ट्रेन पकडण्यासाठी आपण रुळावरुन चालत जाऊ असे त्याने  महिलेला सांगितले. महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानुसार  दोघेही प्लॅटफॉर्मवरुन एकत्र चालत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते.

मृत व्यक्तीचे कुटुंब धुळयामध्ये राहते. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या महिला कर्जाच्या निमित्ताने सर्वप्रथम मृत व्यक्तीच्या संपर्कात आली. कर्ज मागण्यासाठी म्हणून महिला त्याच्याकडे गेली होती. त्यानिमित्ताने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे दोघांमध्ये जवळीक वाढण्यात झाले. महिलेने त्याच्याकडून घेतलेले पैसे कधीही परत केले नाहीत. १८ जानेवारीला हे जोडपे धुळयाहून बसने मुंबईत आले. त्यांनी एकत्र वेळ घालवला आणि हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान दादर-माटुंग्या दरम्यान रेल्वे रुळावर एका निर्जन टप्प्यात आल्यानंतर कथित प्रियकराने महिलेला थांबायला सांगितले आणि लघुशंका करण्यासाठी म्हणून तो गेला. त्यानंतर मागून येऊन त्याने तिच्याच  ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरु असताना महिला तिची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करत होती. अखेर तिची हालचाल थांबल्यानंतर ती मृत झाली असे समजून त्याने तिचे सामान उचलले व तो रुळावरुन पळत सुटला. पण त्याचवेळी समोरुन आलेल्या ट्रेनच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. खरंतर महिलेने स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी मृत बनण्याचे नाटक केले होते. जोडीदार तिथून निघून जाताच ती प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळत सुटली.तिने आधी काही महिला प्रवाशांना नंतर पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मुंबई रेल्वे पोलिसांनी तिची जबानी नोंदवून घेतली. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. महिला यामध्ये सहभागी असल्याचा त्यांना संशय आहे. रेल्वे पोलिसांनी स्थानकातील वेगवेगळे कॅमेरे तपासले मात्र  महिलेच्या सहभागाचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या व्यक्तीने महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न का केला? ते स्पष्ट झालेले नाही. कर्ज न फेडल्यामुळे त्याने महिलेला मारण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!