Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्त्रीवादी लेखिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन

Spread the love

महाराष्ट्रातील स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आज दुपारी त्यांचे पार्थिव प्रभात रोडवरील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आजच संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या हक्काचं व्यासपीठ उभं केलं होतं. महाराष्ट्रभरात प्रवास करुन महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या कायम उभ्या राहिल्या. पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर १९६४ ते १९८३ या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादक झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात मुख्य संपादक झाल्या. तेथून बाहेर पडल्यावर विद्या बाळ यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले.. या मासिकाच्या संस्थापक-संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं. विद्या बाळ यांच्या मार्गदशनाखाली पुण्यात महिलांच्या हक्कासाठी अनेक केंद्र व संस्था स्थापन करण्यात आल्या.१९८१ साली त्यांनी नारी समता मंच या संस्थेची स्थापना नकेली.

ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ग्रोइंग टुगेदर या प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आहे. स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी काही जागा हवी म्हणून त्यांनी ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांनाही याची गरज होती त्यामुळे २००८ साली पुरुष संवाद केंद्र सुरू केलं. त्यांनी महिलांसंबंधित विविध प्रश्नांवर खुलेपणानं चर्चा केली. अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी संस्था व केंद्रे स्थापन केली. त्यांनी बलात्कार झालेल्या मुलीला बलात्कारानंतर मिळालेला पती, कुटुंब आणि गावचा पाठिंबा हे एक समाजासाठी  एक चांगलं उदाहरण होते. त्यामुळे विद्या ताईंनी अशा समाजाभूमिख काम करणाऱ्यांचा सत्कार करण्याचं काम सुरू केलं. वाढत्या स्त्री-भृणहत्येविरोधात निदर्शनं, मोर्चा व परिसंवादाचे आयोजन, विवाह परिषद, कुटुंब नियोजन परिषद, स्त्रियांच्या जागृतीसाठी आत्मसन्मान परिषद आदी उपक्रम विद्याताईंनी सुरू केले. त्यांनी सुरू केलेलं मिळून साऱ्याजणी हे केवळ मासिक नसून महिलांच्या हक्काची चळवळ झाली होती. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या कामाच्या स्वरुपातही बदल केला होता. बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला स्वीकारुन त्यांनी त्या माध्यमातून स्त्री चळवळीचं काम सुरू ठेवलं होतं. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रूपांतरित कादंबरी लिहिली आहे. त्यांच्या लेखणीतून अनेक स्फुट लेख उतरले आहेत. त्यांच्या अचानक निधनाने सामाजिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!