Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाविकास आघाडीच्या शिवभोजन योजनेला पहिल्याच दिवशी मिळाला “असा” प्रतिसाद

Spread the love

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेच्या आजच्या पहिल्याच दिवशी लोकांनी चांगला  प्रतिसाद दिला आहे. शिवभोजनाचा आज शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल ११,२७४ थाळींची विक्री झाली आहे. सध्या राज्यात १२५ केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १,३५० थाळ्यांचं लक्ष्य असताना नाशिकमध्ये १,००० तर ठाणे येथे १,३५० थाळ्यांची विक्री झाली आहे. जळगाव, अहमदनगर, सोलापूर विभागात प्रत्येकी ७०० थाळ्यांची विक्री झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे.


महाराष्ट् विकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या योजनेचा मुंबईत शुभारंभ केला. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटनानंतर नागरिकांना केले. सध्या राज्यात १२५ केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पहिली थाळी लाभार्थ्याला दिली. या थाळीमध्ये भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे असे पदार्थ होते. मात्र, या थाळीचे शहरात आणि ग्रामीण भागात वेगवेगळे दर ठेवण्यात आले आहेत. शहरी भागात ही थाळी १५ रुपयांनी कमी ठेवण्यात आली आहे. गोरगरीब नागरिकांना पोटभर जेवण मिळावे हाच या याजनेमागील उद्देश आहे. ही योजना आजच सुरू करण्यात आली असून, या योजनेत सुरुवातीला काही त्रुटी असू शकतात असे पवार म्हणाले. मात्र या त्रुटी लगेचच दूर केल्या जातील असेही ते म्हणाले.

या बरोबरच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला. मुंबई उपनगरातील महसूल कर्मचाऱ्यांच्या उपहारात ही १० रुपयांत मिळणाऱ्या थाळीचे उद्घाटन करण्यात आले. पोटाला जात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त दरात आणि ते देखील दर्जेदार जेवण असलेली थाळी मिळावी हाच या योजनेमागील उद्देश असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. या थाळीचा ज्यांनी आस्वाद घेतला त्याचा एक फोटो काढला जाणार आहे. त्यानंतर आपण या थाळीचा स्वाद चाखल्याबाबत धन्यवाद असा मेसेज त्या व्यक्तीला पाठवण्यात येणार आहे.

सर्वाधिक विक्री ठाणे, नाशिक या भागांमध्ये झाली आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त १० रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही शिवभोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी १, ३५० थाळ्यांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना हे काम देण्यात येणार आहे. एका केंद्रावर कमीत कमी ७५ आणि जास्तीतजास्त १५० थाळ्यांचे वाटप होणे अपेक्षित आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!