Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नासिरुद्दीन शहा, मीरा नायर , टि एम कृष्णा, रोमिला थापर यांच्यासह ३०० मान्यवरांचा सीएए आणि एनआरसीला विरोध

Spread the love

बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या विरोधात ज्येष्ठ  अभिनेते नसीरुद्दीन शहा, चित्रपट निर्मात्या मीरा नायर, गायक टीएम कृष्णा, लेखक अमिताभ  घोष, इतिहासकार रोमिला थापर यांच्यासह ३०० मान्यवरांनी  यांना विरोध दर्शवला आहे. सीएए, एनआरसी व एनपीपी विरोधात देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे या मान्यवरांनी म्हटले आहे.

इंडियन कल्चरल फोरम यांनी जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार, सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या देशवासीयांना आमचा पाठिंबा आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआरला होणाऱ्या सामूहिक विरोधाला आम्ही सलाम करतो. भारतीय संविधानातील तत्त्वे आणि विविधतेतील एकता अशी ओळख असलेल्या भारत देशाच्या प्रतिमेला यामुळे धक्का लागत असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. या वक्तव्यावर लेखिका अनिता देसाई, किरण देसाई, अभिनेत्री रत्ना पाठक शहा, अभिनेता जावेद जाफरी, नंदिता दास, लिलेट दुबे, सामाजिक कार्यकर्ते आशिष नंदी, सोहेल हाशमी आणि शबनम हाशमी यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची धोरणे व पावले धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय सिद्धांताविरोधात आहेत. या धोरणांवर कोणालाही मत मांडण्याची संधी दिली गेली नाही. यावर खुलेपणाने चर्चा करण्यात आली नाही. संसदेत घाईघाईने हे कायदे मंजूर करून घेण्यात आले, असा दावा या वक्तव्यात करण्यात आला आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि , भारताचा आत्मा धोक्यात आहे. लाखो देशवासीयांचे जीवन आणि नागरिकत्व धोक्यात आहे. एनआरसीमध्ये जो कोणी आपले नागरिकत्व सिद्ध करू शकणार नाहीत, त्यांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाईल. सीएए अंतर्गत मुस्लिमांना सोडून बाकी सर्वांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल, असा दावा यामध्ये करण्यात आला आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भात देशवासी कधीही सरकारला माफ करणार नाहीत. अलीगड तसेच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे. आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता पुष्कळ झाले. भारताच्या धर्मनिरपेक्षतेला आणि सर्वसमावेशी तत्त्वाला धक्का पोहोचवणाऱ्या धोरणांविरोधात आता एकजुटीने उभे राहण्याची वेळ आली आहे, असेही यात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!