Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चीनमध्ये नववर्षाच्या आनंदावर करोनाचे विरजण , ५६ जणांचा मृत्यू , १३ शहरांमध्ये नाकाबंदी

Spread the love

चीनमध्ये चिनी नववर्ष लुनारच्या आनंदावर करोना विषाणूच्या संसर्गामुळे विरजण पडले असून या संसर्गामुळे रविवारपर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ५६ वर पोहोचली असून, या विषाणूचा जवळपास दोन हजार नागरिकांना संसर्ग झाला असल्याचे चीन सरकारने म्हटलं आहे. मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. हा व्हायरस सार्स विषाणू इतकाच धोकादायक असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनच्या ताज्या अहवालानुसार करोनाचे ६८८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूमुळे १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात हुबेई प्रांतात मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आतापर्यंत चीनमधील एकूण मृतांपैकी ५२ जण हुबेई प्रांतातील आहेत.२ जण सेंट्रल हेनन प्रांतातील असून एकजण हेलगजिंग आणि एक हुबेई उत्तर प्रांतातील आहे. शांघाईमध्येही एका व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

दरम्यान चिनी नववर्ष लुनारच्या आनंदावर करोनामुळे विरजण पडले असल्याचे वृत्त आहे. लुनारच्या सेलिब्रेशनसाठी जगभरातून हजारो पर्यटक चीनमध्ये येत असतात. मात्र करोनाच्या भीतीमुळे पर्यटकांनी चीनकडे पाठ फिरविली आहे.चीनमधील अनेक शहरांमध्ये अघोषित बंद जाहीर करण्यात आला आहे. अखेर हुबेई प्रांतात करोनाला रोखण्यासाठी चीन सरकारने शेकडो लष्करी डॉक्टर तैनात करण्यात आले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील १३ शहरांमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील २० प्रांत विभागांमध्ये आतापर्यंत करोना विषाणूच्या संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान चीनमधील हा व्हायरस जगभरात पसरू लागला आहे. अमेरिका, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियात करोनाचे संशयीत रुग्ण आढळून आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!