Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

घुसखोर मुसलमानांना भारतातून हाकलून देण्यासाठी मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा , मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे : राज ठाकरे

Spread the love

मनसेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही, असं सांगतानाच मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास मराठी म्हणून अंगावर धावून जाईल आणि धर्माला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास हिंदू म्हणून अंगावर धावून जाईल, अशी गर्जना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.

मनसेच्या गोरेगाव येथे नेस्को मैदानावर आयोजित राज्यव्यापी महाअधिवेशनला संबोधित करताना राज ठाकरे यांनी  हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेची भूमिका स्पष्ट केली. मी मराठी आहे आणि हिंदूही आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझी भाषणं तपासा त्यातही तेच ऐकायला मिळेल. हे काही मी आज बोलत नाही. मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर धावून जाईल आणि माझ्या धर्माला नख लावाल तर हिंदू म्हणून अंगावर धावून जाईल, असा इशारा देतानाच माझा कोणताही वैचारिक गोंधळ नाही. माझे विचार सरळ आणि स्वच्छ आहेत, असं राज म्हणाले.

मुस्लिम समाजाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले , देशाशी प्रामाणिक असलेले मुसलमान आमचेच आहेत. आम्ही माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम, क्रिकेटपटू झहीर खान आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना नाकारू शकत नाही. मात्र इथे कुणी धिंगाणा घातला तर आम्ही आडवे जाणारच, असं सांगतानाच प्रत्येकानं आपला धर्म घरातच ठेवावा. मशिदीवर भोंगे हवेतच कशाला. आमची आरती जर तुम्हाला त्रास देत नसेल तर नमाजचा त्रास का? नमाजाचे पठण जरूर करा. त्यासाठी भोंगे हवेत कशाला? असा सवालही त्यांनी केला. मी हिंदुत्वाबाबत यापूर्वीही अनेकदा बोललो होतो. तेव्हा कुणीही हिंदुत्वाकडे चाललात का म्हणून विचारलं नाही. आता मात्र मला प्रश्न विचारला जातोय. आम्हाला तुम्ही असा प्रश्न का विचारता. आम्हाला आमचा मार्ग माहित आहे, अशा कानपिचक्याही त्यांनी टीकाकारांना लगावल्या.

नागरिकत्व सुधारणा  कायदा आणि एनआरसीलाही राज ठाकरे यांनी आपले समर्थन दिले. आपला देश म्हणजे एक धर्मशाळा होऊ पाहत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोर आपल्या देशात मोठ्या संख्येने आहेत. भारतात अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत. त्यामुळे आतच मोठा धोका निर्माण झाला आहे. उद्या पाकिस्तानसोबत युद्ध झालं तर भारतीय सैन्याला आतल्याच शत्रूंशी आधी लढावे लागेल. त्यामुळे एनआरसीचं नंतर बघू आधी पाकिस्तान सोबतची समझोता एक्सप्रेस आणि बससेवा बंद करा. पाकिस्तान सोबत आपल्याला संबंध हवेतच कशाला, असं सांगतानाच काश्मीर आणि राम मंदिराचा राग काढण्यासाठीच सीएएला विरोध करणारे मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चात आतले आणि बाहेरचे मुसलमान किती होते हे आधी तपासा. या मोर्चांना मोर्चानेच साथ दिली पाहिजे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात मनसेच्यावतीने मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात मोठ्या ताकदीनं सहभागी व्हा, असं आवाहन राज यांनी मनसे सैनिकांना केलं.

देशविरोधी कारवायांवर संशय घेताना राज ठाकरे म्हणाले , महाराष्ट्रात अनेक भाग असे आहेत की तिथे पोलिसांना जाता येत नाही. या ठिकाणी देशातील आणि देशाबाहेरील मौलवीच जात असतात. या ठिकाणी काही तरी शिजतंय. या ठिकाणी मोठं कारस्थान घडवण्याचा डाव असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून मला ही माहिती मिळाली आहे. सर्वच तुम्हाला सांगता येणार नाही. त्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!