Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरोना व्हायरस : मुंबईतील डॉक्टरांना अलर्ट , चीनहुन भारतात आलेल्या दोन संशयित रुग्णाची तपासणी

Spread the love

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चिचंपोकळीतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून इथेच त्याच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत, असे मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. मुंबईत दोन संशयित कोरोना व्हायरस रुग्ण आढळले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे. हे दोघे संशयित रुग्ण चीनहून मुंबईत दाखल झाले आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत चीन मधून आलेल्या या दोन संशयित रुग्णाला खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे डॉ. केसकर यांनी सांगितले. चीनहून मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरलची काही लक्षणे आढळल्यास त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना विमानतळावरील डॉक्टरांना करण्यात आल्या असल्याचेही केसकर म्हणाल्या. महाराष्ट्र सरकारकडून कस्तुरबा रुग्णालयाला कोरोना व्हायरससंबंधित रुग्णांना हाताळण्याविषयी सूचना करण्यात आल्या असून, त्या तंतोतंत पाळण्यात याव्यात असे राज्य सरकारने कस्तुरबा हॉस्पिटलला सांगितले आहे.

या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मुंबईतील कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण हे वसई नालासोपारा या भागातले आहेत. ते गेल्या १४ दिवसांत चीनमध्ये जाऊन आले होते. विमानतळावरच त्यांच्यातली लक्षणं दिसली. म्हणून त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी डॉक्टरांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं आहे. चीनहून मुंबईत परतलेल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसल्यास तात्काळ महापालिका प्रशासनाला कळवून  विशेष वॉर्डमध्ये भरती करावं, अशा सूचना मुंबई पालिका प्रशासनाने दिल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!