Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : साईबाबांच्या जन्मभूमीवर पाथरीकर ठाम , उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार , बिडकर म्हणतात आमची कर्मभूमी तर धूपखेड्याचा प्रगटभूमीचा दावा

Spread the love

शिर्डीतील साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद अद्याप मिटला नसून साईबाबांचं जन्मस्थळ पाथरीच असल्याचा ठराव पाथरीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला असून  पाथरीकरांचे  शिष्टमंडळ उद्या, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात संशोधन समिती नेमण्यात यावी, अशी विनंती ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यावर, पाथरी नव्हे, तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे निक्षून सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. याप्रश्नी चर्चेअंती तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आणि बंद मागे घेण्याची विनंतीही केली होती. या विनंतीला मान देत शिर्डीकरांनी रविवारी रात्री बंद मागे घेतला. या प्रश्नावर सोमवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीने बैठक घेतली व वादावर यशस्वी तोडगा काढला. हा वाद मिटल्याचं सांगितलं जात असतानाच, साईबाबांचं जन्मस्थळ पाथरीच आहे, असा ठराव पाथरीच्या ग्रामसभेत करण्यात आला. यासंदर्भात एक समिती नेमली जावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार असल्याचं सांगण्यात आलं. पाथरीतील लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ उद्याच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईत भेट घेणार आहे. ते शिष्टमंडळ आजच मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळते.

दरम्यान साईबाबांच्या जन्मस्थळाचा कुठलाही उल्लेख न करता पाथरी येथील तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी झालेल्या बैठकीत दिले आणि त्यानंतर, ‘मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे आमचे समाधान झाले असून, आम्ही आंदोलन मागे घेत आहोत’, असे शिर्डीचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या वादाला तूर्तास पूर्णविराम मिळाल्याचं म्हटलं जात होतं.

शिर्डी आणि पाथरीकरांचा वाद चालू असतानाच साईबाबा हे बीडमध्ये काही वर्षे नोकरी करत होते, असा दावा बीडमधील साईभक्तांनी केला आहे. बीड ही साईबाबांची कर्मभूमी आहे. सरकारने या कर्मभूमीतील तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर साईबाबा हे सर्वप्रथम धुपखेडा येथे प्रगट झाले असल्याचा दावा येथील गावकऱ्यांनी केला आहे. सरकारनं धुपखेड्याला साईबाबा यांची प्रगट भूमी जाहीर करून गावात येणाऱ्या साईभक्तासाठी निधी देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!