Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिर्डीकरांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी केले समाधान , पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकासालाही हिरवा कंदील

Spread the love

साईबाबांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थांनी पुकारलेला बंद मागे घेण्यात आल्यानंतर आज सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी झाली. या बैठकीत शिर्डीच्या ग्रामस्थांनी पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास हरकत नसल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान शिर्डीकरांचे समाधान करीत मुख्यमंत्र्यांनी पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अखेर मंजुरी दिली आहे. विनाकारण साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद कशासाठी, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित करीत शिर्डीकरांचे समाधान केले असल्याचे वृत्त आहे.

मराठवाड्यातील पाथरी या गावाला साई जन्मस्थानाचा दर्जा मिळाल्याने शिर्डीकर संतप्त झाले होते त्यावर शिर्डीच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर आमचा वाद मिटला आहे. आम्ही बंद मागे घेतोय ही भूमिका शिर्डीकरांनी जाहीर केली. पण पथरीला दिलेल्या जन्मस्थानाचा मुद्दा निकाली निघाला का? यावर मात्र शिर्डीकरांनी कुठलेही भाष्य केले नाही.

या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. शिर्डी ग्रामस्थांची भूमिका मांडताना साईभक्तांच्या भावना लक्षात घेऊन बंद पाळला. यापूर्वी जन्मस्थळाबाबत शासनाची कुठलीच भूमिका नव्हती, अशीच भूमिका आता असावी असा मुद्दा आमदार श्री. विखे- पाटील यांनी यावेळी मांडला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ग्रामस्थांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत आपण पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भागाचा देखील विकास व्हावा, हि शासनाची इच्छा आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री यांचा शिर्डी संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही  करण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!