साईबाबांच्या जन्म स्थळाच्या वादातून शिर्डीत कडकडीत बंद , मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

Spread the love

साईबाबांच्या जन्मस्थळावरून सुरु असलेल्या वादावरून आजपासून शिर्डीत बेमुदत बंद सुरु झाला असून या बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. बंदच्या दरम्यान साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तासाठी मंदिर मात्र सुरू राहणार आहे. पण, वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली आहे. साईबाबा जन्मभूमी वादाबाबत शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारची सुट्टी असल्यामुळे भाविकांची साई दर्शनासाठी शिर्डीत मोठी गर्दी झाली आहे. बंद बरोबरच शिर्डी शहरात ग्रामस्थ व साईभक्तांनी रॅली काढली. मुख्यमंत्री पाथरी ही साईजन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

द्वारकामाईसमोर शिर्डीत आज सकाळी सर्वधर्म सद्भावना परिक्रमा रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात  ‘शिर्डी माझे पंढरपूर’ हि आरती करून करण्यात आली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ‘ओम साई नमो नम: ‘ चा जयजयकार करीत पालखी मार्गाने परीक्रमा शहरात काढण्यात आली. साईचरित्रातील ओव्यांचे फलक मोर्चेकऱ्यांनी आपल्या हातात घेतले होते. यावेळी सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी साईबाबांच्या जन्मस्थान असलेल्या पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. शिर्डीकरांच्या म्हणण्यानुसार पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थान म्हणून ओळख नको, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले आहे.

बंदच्या पूर्वी झालेल्या ग्राम सभेत भाविक आपल्यासाठी देवच आहे, त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वानी काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, साई मंदिर सुरू राहणार आहे. पाथरीला निधी देण्यास विरोध नसून त्याचा साई जन्मभूमी उल्लेख करण्यास आमचा आक्षेप आहे, अन्य आठ जन्मस्थळाच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे ग्रामसभेत सांगण्यात आले. रविवारी सकाळी शिर्डी ग्रामस्थांनी द्वारकामाई येथे जमून शहरातून परिक्रमा काढण्याचे ठरवले असून, यामध्ये साईचरित्रातील ओव्यांचे फलक हातात घेऊन साईजन्मभूमीबाबत कुठेही उल्लेख नसल्याचा संदेश देणार आहे. शिर्डीकरांची भूमिका कोणाच्या विरोधात नाही, परंतु ज्या लोकांनी बेछूट आरोप करीत मुक्ताफळे उधळली त्या प्रवृत्तींचा मी जाहीर निषेध करतो. शिर्डीत बंदला माझे पूर्ण समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी केले.


मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक 

दरम्यान शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याच्या ग्रामस्थांच्या निर्णयानंतर या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीस शिर्डी आणि पाथरीमधील संबंधितांना बोलाविण्यात आले आहे. शिर्डीच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी मध्यममार्ग काढावा, अशी मागणी सर्व संबंधितांनी केली आहे. शिर्डी बंद मागे घेण्याची विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असली तरी ती फेटाळून लावण्यात आली.


 

आपलं सरकार